Breaking News

शैक्षणिक सत्र संपण्याआधिच एसटी प्रशासनाविरोधात विद्यार्थी संतप्त; मोफत पास वाटप बंद

सातारा / प्रतिनिधी : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना 2018-19 च्या उर्वरित सत्रात मोफत पास देण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला होता. परंतु, उर्वरित शैक्षणिक सत्र संपले नसताना दि. 1 एप्रिलपासून मोफत पास वाटप बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मासिक पासमध्ये 66.67 टक्के रक्कमेची सवलत मिळते. विद्यार्थ्यांकडून 33.33 टक्के रक्कम घेऊन मासिक पास दिला जातो. दुष्काळी सवलतीचा भाग म्हणून विद्यार्थ्यांकडून वसूल करण्यात येणारी 33.33 टक्के रक्कम सुध्दा 2018-19 च्या उर्वरित सत्रात घेऊ नये असे आदेश महाव्यवस्थापकांनी दिले होते.

महाव्यवस्थापकांच्या या आदेशानुसार नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि 15 एप्रिल अखेरीस मोफत पास मिळाले होते. मात्र, एक एप्रिलपासून मोफत पास बंद करण्यात आले आहेत. 2018-19 च्या द्वितीय शैक्षणीक सत्रातील परिक्षा एप्रिल महिन्यात होणार आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मोफत पासची मुदत समाप्त होणारे विद्यार्थी नूतनीकरण करण्यासाठी आगारात जात आहेत. परंतु, सवलत मार्च अखेरीस बंद झाली असल्याचे सांगून मोफत पास देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि आगार प्रमुखांमध्ये वारंवार वादावादी होत आहे.