Breaking News

पाण्याचा प्रश्र्न सोडविण्याची हमी देणार्‍या उमेदवारास मतदान करु


औंध / प्रतिनिधी : औंधसह सोळा गावांचा पाणीप्रश्र्न सोडविण्यासाठी माढा लोकसभेतील कोणत्याही उमेदवाराने हा जिव्हाळ्याचा प्रश्र्न सोडविण्याची हमी देणार्‍या उमेदवारासच मतदान करू व यापैकी कोणीही हा पाणीप्रश्र्न सोडविण्याची हमी दिली नाही तर ‘नोटा’चा पर्याय स्वीकारणार असल्याचे गोपुज येथील धनाजी पाटील व श्रमिक मुक्ती दलाचे तालुकाध्यक्ष जयवंत खराडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, औंधसह सोळा गावांसाठी मोठा लढा सामाजिक कार्यकर्ते यांच्याबरोबर शेतकरी यांनी उभारला होता, ज्या जलद गतीने काम होणे अपेक्षित होते, त्या पद्धतीने काम होत नसल्याने शेतकर्‍यांनी किती वाट पहायची असा प्रश्र्न निर्माण झाला आहे. 

खटाव तालुक्यातील प्रत्येक निवडणूक ही आजपर्यंत पाण्याची स्वप्ने दाखवूनच लढली गेली आहे. मात्र आता आम्ही औंधसह सोळा गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून आम्हाला पाणी महत्वाचे आहे, पक्ष कोणताही असुदे आमच्या प्रश्र्नाची सोडवणूक करण्याची हमी देणार्‍या उमेदवारास मतदान करू, अन्यथा वेळप्रसंगी ‘नोटा’चा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित 16 गावातील मतदारांशी केव्हा चर्चा करणार हे मात्र त्यांनी निश्चितपणे सांगितले नाही.