Breaking News

राफेलचे सत्य समोर आणणार पवार यांची ग्वाही; दीडपट हमीभाव आणि कर्जमाफीचे आश्‍वासनबुलडाणाः देशात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सरकार बहुमताने सत्तेवर आल्यानंतर शेतकर्‍यांचा प्रश्‍न जसा तातडीने सोडवणार आहोत, तसेच राफेल कराराची सखोल चौकशी करून यातील सत्य सर्वांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलताना पवार यांनी मोदी यांच्यावर टीका केली. मोदी यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीवर पावर यांनी प्रहार केले. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना मोदी सरकार कसे जबाबदार आहे, हे त्यांनी सांगितले. पवार म्हणाले, की आम्ही शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देणार आहोत. त्याचबरोबर उत्पन्नाच्या दीडपट हमीभाव देवू. आम्ही नुसत्या घोषणा करत नाही. यापूर्वीही कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर तडजोड नाही म्हणजे नाही. लोकशाहीची चौकट मोडू पाहणार्‍या मोदी यांना धडा शिकवण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी आणि मोदी सरकार घालवण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी डॉ. शिंगणे म्हणाले, की मी तुमच्यातील माणूस आहे हे लक्षात घ्या. दहा वर्षे त्या खासदाराला संधी दिलीत. मला फक्त 5 वर्षे संधी द्या. तुमच्यावर पश्‍चाताप करण्याची वेळ येणार नाही.
या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र तुपकर यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे नेते मुकुल वासनिक यांनीही मोदी व फडणवीस सरकारवर टीका करताना संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार आल्यावर शेतकर्‍यांना कर्जमाफी देणार असल्याचे सांगितले.