Breaking News

ग्रामीण भागात दिसतोय प्रचाराचा जोर शहरी भागात मात्र सामसूम


सातारा / प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला जवळपास 15 दिवसांचा कालावधी शिल्लक असताना राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडी तसेच भाजप- शिवसेना युतीने ग्रामीण भागात दौरे, बैठकांचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. शहर व उपनगरात अद्यापही राजकीय पटलावर सामसूम दिसत असून, आयपीएल क्रिकेट सामन्यांमुळे प्रचार नियोजनावर परिणाम होत आहे. तरुण कार्यकर्ते क्रिकेट सामन्यांत दंग असल्याने राजकीय पक्षांच्या डोकेदुखीत वाढ झाल्याची चर्चा आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात आघाडी व युतीने एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत. या दोन पक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या भेटीगाठी घेणे, कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदानासाठी जनजागृती करणे व पक्षाची ध्येयधोरणे समजावून सांगण्यासाठी मागील सहा महिन्यांपासूनच भाजप व राष्ट्रवादीने पुढाकार घेतल्याचे चित्र होते. ग्रामीण भागाला पिंजून काढण्यात या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर व उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतरही संबंधित राजकीय पक्षांनी ग्रामीण भागालाच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. कॉर्नर बैठका, मेळाव्यांचा धडाक्यात बार उडत आहे. त्या तुलनेत शहरात मात्र सामसूम असून, प्रचार, बैठका किंवा सभांचा कोठेही मागमूस नसल्याचे चित्र आहे.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उन्हाचा पारा 40 अंशाच्या पार गेला आहे. सूर्यनारायण आग ओकू लागल्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांना मतदारही भेटत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सकाळी 11 पर्यंत व सायंकाळी 6 नंतर मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे नियोजन राजकीय पक्षांकडून केले जात असल्याची माहिती आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आयपीएल क्रिकेट सामने रंगात आले आहेत. बोटावर मोजता येणारे कार्यकर्ते वगळल्यास बहुतांश कार्यकर्ते क्रिकेटचे सामने पाहण्यात दंग असल्याचे चित्र आहे. यामुळे शहरी भागात बैठका घेणे, प्रचार करणे तूर्तास तरी अवघड झाले असून, यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहेे.