Breaking News

माढ्यात राष्ट्रवादीचे बारा वाजवणार : शेखर गोरेसातारा / प्रतिनिधी : आतापयर्र्त राष्ट्रवादीसाठी जीवाचे रान केले मात्र त्याच्या मोबदल्यात मला कधीही बळ देण्यात आले नाही. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मागील 1 वर्षात एकदाही वेळ दिला नाही. फलटणच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माझ्या व्यथा मांडण्यार्‍या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याने यापुढे आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करुन लोकसभा निवडणुकीसाठी माढ्यातील भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेच काम करणार अशी माहिती माण -खटावचे युवा नेते शेखर गोरे यांनी हॉटेल सयाजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मात्र आपल्या शुभेच्छा असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे राजांच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. राजकारण सोडून देईन मात्र आमदार जयकुमार गोरेंशी कधीही तडजोड करणार नाही अशी गर्जनाही त्यांनी यावेळी केली.

आपल्या भावनांना वाट करुन देताना शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीने आतापर्यंत केलेल्या अन्यायाचा पाढाच पत्रकारांसमोर मांडला. माण-खटाव भागात साधा एकही ग्रामपंचायत सदस्य नसताना आम्ही राष्ट्रवादीला पंचायत समिती, जिल्हा परिषद, विविध गावातील सोसायट्यांवर वर्चस्व मिळवून दिले मात्र, त्यानंतरच्या काळात अनेकवेळा मला डावलण्याचा प्रयत्न झाला. माझ्यावर अनेक खोट्या केसेस दाखल केल्या गेल्या.
विधानपरिषदेला राष्ट्रवादीची 127 मते जादा असताना एकही जण मोहनराव कदमांच्या विरोधात उभा राहण्यास तयार नव्हता. त्यावेळीही मला काही बरेवाईट झाल्यास दुसरी मोठी संधी दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ते पाळले गेले नाही. मुळात विधानपरिषदेच्या वेळी कोणी कोणाकडून आणि कधी किती मलिदा खाल्ला याची यादीच माझ्याजवळ आहे. अगदी छायाचित्रासहीत आहे. मात्र योग्य वेळ आल्यानंतर याचा मी पर्दाफाश करणार असल्याचेही शेखर गोरे यांनी यावेळी सांगितले.

दहशतीला मी कधीही घाबरत नाही, माढ्याच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मी फलटण जाणारच आहे. लोकशाहीत कोणीही कोणाला कोठे जाण्यासाठी अडवू शकत नाही. लोकसभेला माढ्यातील युतीच्या उमेदवाराला पडणारी मते आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पडणारी मते यावरुन सगळे स्पष्ट होणारच आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व श्रीकांत भारती यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतरच भाजपाच्या उमेदवाराला पाठींबा देण्याचा निणर्य घेण्यात आला असल्याचे सांगत आमदारकी असा कोणताही शब्द न घेता एकवेळी आमदारकी नसली तरी चालेल माझ्या दुष्काळातील भागातील लोकांना पाणी मिळावे व त्यांच्या आयुष्याला लागलेला दुष्काळग्रस्त हा कलंक पुसावा यासाठीच भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
नरेंद्र मोदी सामान्य लोकांसाठी चांगले काम करत आहेत त्यासाठी मी त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. मी अजूनही भाजपात अधिकृतपणे प्रवेश केलेला नाही. केवळ भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला आहे. भविष्यातील निवडणूक मी अपक्ष म्हणूनही लढवू शकतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत आता राष्ट्रवादीत परत जाणार नाही, असा निश्चयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
युवकांनो राष्ट्रवादीत कधीही जावू नका असे आवाहन करत राष्ट्रवादी हा पक्ष नवीन नेतृत्वाला कधीही संधी देत नाही तर त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम करतो. राष्ट्रवादीत येताना युवकांनी हजारवेळा विचार करावा, राष्ट्रवादीपासून सावध रहा असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गेल्या वर्षभरात अनेकवेळा मागणी करुनही मला वेळ दिला नाही. माझ्या व्यथा ऐकून घेतल्या नाहीत ही मोठी शोकांतिका असल्याचे नमूद केले.
मध्यंतरी फलटण येथे झालेल्या गोंधळानंतर रामराजेंनी माझी भेट घेतली होती मात्र, मी त्यांना कोणताही शब्द दिला नाही. त्यानंतर माझ्या अत्यंत विश्वासू अशा निवडक कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी आता राष्ट्रवादीत राहायचे नाही असा निर्णय घेतला.
माढ्यात भाजपाला पाठींबा असेल तर सातार्‍यात उदयनराजे आपले चांगले मित्र आहे त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार या प्रश्नावर त्यांनी उदयनराजे हे छत्रपती शिवाजीमहाराजांचे थेट तेरावे वंशज असल्याने मलाच नव्हेतर महाराष्ट्रातील तमाम जनतेला त्यांच्याबद्दल आदर आहे. तसाच मलाही आहे. मला त्यांचा रोखठोक स्वभाव व डॅशिंग, सडेतोड बोलण्याची स्टाईल आवडते. उदयनराजे जे बोलतात ते करुन दाखवतात. इतरांसारखा पाठीत खंजीर खुपसण्याचा त्यांचा स्वभाव नाही त्यामुळे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. अशा शब्दात उदयनराजेंबद्दल असलेला आपला सॉफ्ट कॉर्नर स्पष्ट केला.
आमदार जयकुमार गोरे जसा माझा राजकीय शत्रू आहे तसाच राष्ट्रवादीही माझा दुश्मन आहे. आजपर्यंत मी राष्ट्रवादी पक्षाकडून कोणताही निधी घेतलेला नाही. तालुक्यातील कामे मी माझ्या स्वबळावर केली आहेत.
राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय मी कोणत्याही माझ्या पदाधिकार्‍याला कळवलेला नाही. आता राष्ट्रवादीचे असलेले पदाधिकारी हे माझेच आहेत आणि माझ्यासाठीच काम करणारे आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते राष्ट्रवादीत असले तरी माझेच नेतृत्व मानणारे आहेत. त्यातील एका पदाधिकारीने शेखर गोरेंच्या पाठींब्याशिवाय निवडून येवून दाखवावे मी राजकारण संन्यास घेईन असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.