Breaking News

ममतांनी पश्‍चिम बंगाल केला गुंडाच्या हवाली; मोदी यांचा आरोप; ‘माँ-मांटी-मानुष’ या घोषणेवरून टीकास्त्रकूचबिहार:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्‍चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये आज घेतलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ममतांची ‘माँ-माटी-मानुष’ ही घोषणा तद्दन खोटी आहे. राजकीय फायद्यासाठी घुसखोरांना वाचवून त्यांनी मातीसोबत विश्‍वासघात केला आहे. पश्‍चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली करून त्यांनी अपेक्षाभंग केला आहे आणि सर्वांना अडचणीत टाकले आहे, अशी टीका त्यांनी केली.

कूचबिहारच्या प्रचारसभेत मोदी यांनी ममतांना लक्ष्य केले. ममतांना त्यांनी ‘स्पीड ब्रेकर दीदी’ असे संबोधले. ममतांनी केंद्र सरकारच्या योजनांना प्रत्येक वेळी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप त्यांनी केला. ममता अस्वस्थ झाल्या आहेत. त्या खूप घाबरल्या असून, त्यांची झोप पुरती उडाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘स्पीड ब्रेकर दीदींनी केंद्राच्या योजना रोखल्या नसत्या तर आज अनेक योजनांचा तुम्हाला लाभ मिळाला असता. आता याच दीदींना धडा शिकवण्यासाठी या लोकसभा निवडणुका आल्या आहेत. तुम्ही केंद्रात आम्हाला बळकट केलेत, तर दीदींना झुकावे लागेल आणि तुमच्यासाठी विकासकामे करावीच लागतील. त्यांची मनमानी आता चालणार नाही, हे त्यांना समजेल,’ असेही मोदी म्हणाले.

दीदींचा खरा चेहरा जगासमोर आणणे गरजेचं आहे. त्या पश्‍चिम बंगालची संस्कृती, येथील नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. हा चौकीदार तुमच्या हिताचे रक्षण, देशातील लोकांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. भ्रष्टाचार करणार्‍यांकडून हा चौकीदार सगळे हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही, असे आश्‍वासनही त्यांनी दिले.