Breaking News

कर्ज थकवल्याप्रकरणी दोन संचालक निवडणुकीस अपात्र


कर्जत/प्रतिनिधी :मिरजगाव येथील ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन ज्ञानोबा खेतमाळीस आणि अण्णा नारायण बनकर या संचालकांना सेवा संस्थेचे कर्ज थकवल्याच्या कारणावरून सहाय्यक निबंधक डॉ. अंजली वाघमारे यांनी सहकारी संस्थेची निवडणूक लढविण्यासाठी सहा वर्षासाठी अपात्र ठरविले आहे.

मिरजगाव येथील उपसरपंच अमृत लिंगडे यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेकडे (कर्ज) यांच्याकडे 13 डिसेंबर 2018 रोजी तक्रार अर्ज दिला आहे. या अर्जात त्यांनी म्हटले की, मिरजगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक नितीन खेतमाळीस आणि अण्णा बनकर यांनी सेवा संस्थेकडून शेतीसाठी कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाची परतफेड केली नाही. थकबाकी राहिली आहे. यामध्ये नितीन खेतमाळीस यांच्याकडे 1 लाख 1 हजार 790 रुपये तर अण्णा बनकर यांच्याकडे 55 हजार रुपये थकबाकी आहे. संस्थेचा संचालक थकबाकीदार राहिल्यास सहकार कायद्याप्रमाणे ते संचालक म्हणून राहण्यास अपात्र ठरतात. तरी त्यांचे संचालकपद रद्द करण्यात यावे,’ अशी तक्रार अमृत लिंगडे यांनी केली होती.

या तक्रार अर्जावर 31 जानेवारी 2019 रोजी सुनावणी झाली. या वेळेस संचालक नितीन खेतमाळीस व आण्णा बनकर हे दोघेही गैरहजर होते. तर तक्रारदार अमृत लिंगडे, सेवा संस्थेचे सचिव महानवर आणि प्रतिवादींचे वकील उपस्थित होते. या वेळी वकिलांनी पक्षकार बाहेरगावी गेले आहेत, असे सांगितले. यानंतर 21 फेब्रुवारी रोजी सहाय्यक निबंधकांनी सुनावणी ठेवली होती. या वेळीही नितीन खेतमाळीस व अण्णा बनकर गैरहजर राहिल्याने सहाय्यक निबंधकांनी विनंती फेटाळून लावत सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 73 क अ नुसार या दोन्ही संचालकांना संस्थेच्या संचालकपदावरून कमी करण्यात येत आहे. संस्थेच्या विद्यमान समितीची मुदत संपेपर्यंत आणि पुढील पंचवार्षिक समितीची मुदत संपेपर्यंत कोणत्याही सहकारी संस्थेच्या समितीचा सदस्य म्हणून निवडून येण्यास किंवा पुन्हा स्वीकृत केला जाण्यास किंवा पुन्हा नामनिर्देशित केला जाण्यास, पात्र राहणार नाहीत, असा निकाल दिला आहे. यामुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.