Breaking News

आगीत १४ लाखांचे डाळिंब पॅकिंग साहित्य जाळून खाक


संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावानजीकच्या पांढरी वस्ती येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत अंदाजे १३ लाख ३० हजार रुपयांचे डाळिंब पॅकिंग साहित्य जाळून खाक झाले आहे. हि घटना शनिवारी (३० मार्च) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

निळवंडे गावानजीकच्या पांढरी वस्ती येथे भाड्याच्या शेड मध्ये दिलीप बाजीराव उकिर्डे डाळिंब पॅकिंगसाठी लागणारे बॉक्स कात्रण व्यवसाय करतात. शनिवारी रात्री विजेच्या शॉर्टसर्किटमुळे शेडला लागलेल्या आगीत पॅकिंग साहित्याची मशीन, वजन काटा, बॉक्स, पेपर, कात्रण, कच्चा माल जाळून खाक झाला. सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, अशोक उंबरडे, निवृत्ती पवार यांच्यासह ग्रामस्थांनी विझविण्यासाठी प्रयत्न केला. संगमनेर नगरपालिका व थोरात साखर कारखान्याचा अग्निशमन बंब बोलावून आग विझविली; मात्र तोपर्यंत शेडमधील साहित्य जळून खाक झाले होते. तलाठी जया पान्हाड यांनी घटनेचा पंचनामा केला असून अंदाजे १३ लाख ३० हजार रुपयांचे साहित्य जळाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.