Breaking News

‘आप’-काँग्रेसमध्ये दिल्ली, हरयाणात युती



नवी दिल्लीः ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या न्यायाप्रमाणे कट्टर विरोधक असलेले दिल्लीतील आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने अखेर लोकसभा निवडणुकीकरता दिल्ली आणि हरयाणामध्ये एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पक्षांमध्ये एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू होत्या; पण ‘आप’शी हातमिळवणी करण्यासाठी मात्र दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी नकार दिला होता. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील बोलणी फिस्कटली होती. ‘आप’नेदेखील त्यानंतर ‘एकला चलो रे’ म्हणत दिल्लीतील लोकसभेसाठी तयारी केली होती; पण अखेर काँग्रेस-‘आप’ने हातमिळवणी केली आहे. दरम्यान, दोन्ही पक्षांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला देखील निश्‍चित केला असून दिल्लीत काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. हरयाणामध्ये करनाल, फरिदाबाद आणि गुरूग्राम या तीन जागा काँग्रेसने ‘आप’ला द्यायची तयारी केली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होईल.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या वेळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, पीसी चाको हजर होते. तत्पूर्वी काँग्रेसने सर्व जिल्हाध्यक्षांची देखील बैठक बोलावली होती. सार्‍या राजकीय स्थितीचा आढावा घेत अखेर काँग्रेसने ‘आप’शी हातमिळवणी करण्यास तयारी दर्शवली आहे. काँग्रेस-‘आप’एकत्र आल्याने आता भाजपला दिल्लीत मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे दिल्लीतील सात जागांवर कोण बाजी मारणार हे देखील पाहावे लागणार आहे. दिल्लीत सध्या ‘आप’ची सत्ता आहे. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहेत. त्यामुळे या निकालाअंती काँग्रेस-‘आप’चा एकत्र आल्याने परिणाम काय झाला हे स्पष्ट होईल.

पवारांची शिष्टाई कामाला

‘आप’आणि काँग्रेसमध्ये युती करण्यावरून वाद होते. काँग्रेस आणि ‘आप’ मधील एक-एक गट युतीला अनुकूल होता, तर दुसरा गट विरोधात होता. मागच्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपचे आव्हान मोडीत काढण्यासाठी दोन्ही पक्षांत दोन राज्यांत युती होणे कसे आवश्यक आहे, यावर भर दिला होता. त्यांनी केजरीवाल व राहुल यांच्यांशी चर्चा केली. त्यातून तुटलेली युती पुन्हा जुळली.