Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ना. नरेंद्र पाटील यांच्याकडून अभिवादन


कराड / प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त आज येथील बुधवार पेठेतील डॉ. आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास मध्यरात्री शिवसेना, भाजपा, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य भरत पाटील उपस्थित होते. 

मध्यरात्रीपासूनच कराडमध्ये ठिकठिकाणी जल्लोष करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. येथील बुधवार पेठेत महायुतीचे उमेदवार ना. नरेंद्र पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. 

यावेळी ते म्हणाले, घटनेच्या माध्यमातून देशाचं कल्याण साधून जग आणि युवा पिढीसमोर आदर्श निर्माण करणारे महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब. डॉ. बाबासाहेब म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न आहे. डॉ. बाबासाहेब एक व्यक्तिमत्वच नव्हे तर एक सामाजिक उत्क्रांतीचे एक संस्थान आहे. त्यांचे आदर्श एका संजीवनी सदृश आहेत. या ज्ञानाच्या महासागरास विनम्र अभिवादन.