Breaking News

माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न : अशोक चव्हाण


नांदेड : मला चक्रव्यूहात अडकवले जात असून, माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. देशाचे पंतप्रधान नांदेडमध्ये दोनदा आले. पाच वर्षांपूर्वी जेव्हा ते आले तेव्हा मतदारांना भाईयो और बहनो बोलून फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र नांदेडच्या जनतेने मला 80 हजार मताधिक्याने निवडून दिले होते. आता ते पुन्हा आले आणि मला शिव्या घालत आहेत. पण हा अशोक चव्हाण तुमच्यातच राहणार आणि तुमच्यातच मरणार, एवढे लक्षात ठेवा. अशी भावनिक साद त्यांनी भोकर येथील सभेत लोकसभेचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी केले. 

अशोक चव्हाण हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि स्टार प्रचारक आहेत. मात्र असे असतानाही ते नांदेडमध्येच अडकून पडले आहेत. याचीच सल त्यांनी काल भोकर येथील सभेत बोलून दाखवले. मला हरवण्यासाठी पंतप्रधान दोन वेळा, राज्याचे मुख्यमंत्री तीन वेळा नांदेडमध्ये प्रचारासाठी आले. कसंही करा पण अशोक चव्हाणला पाडा, अशी रणनीती भाजपच्या नेत्यांनी आखलेली दिसते. आता नितीन गडकरी, पियुष गोयल देखील येणार आहेत. एका अशोक चव्हाणासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रातले मंत्री येत आहेत. चर अशोक चव्हाणला अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर नांदेडच्या जनतेने त्यांना उखडून टाकावे, असे आवाहन देखील यावेळी अशोक चव्हाण यांनी केले.

एखादा कार्यकर्ता चुकीचा वागत असेल तर त्याला निवडणुकीनंतर त्याला सरळ केल्याशिवाय राहणार नाही. मात्र तोपर्यंत वड्याचे तेल वांग्यावर टाकू नका, कार्यकर्त्यांच्या चुकीच्या कामाची शिक्षा मला देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.