Breaking News

विवाहित मुलीसह आई- वडिलाची आत्महत्या


कराड / प्रतिनिधी : विद्यानगर- सैदापूर येथे शुक्रवारी दुपारी विवाहीत मुलीसह आई आणि वडील या तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. विद्यानगर येथील गुरूदत्त कॉलनी येथे दुपारी तीनच्या सुमारास मुलीने विष पिऊन तर आई, वडिलांनी गळफास घेतला.

घटनेत आत्महत्या केलेल्यामध्ये वडिल शिवाजी आनंदा मोहिते (वय 59), आई- सौ. बेबी शिवाजी मोहिते (43) व मुलगी - वृषाली विकास भोईटे (23) असे संबधित आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, उंब्रज जवळील कोरिवळे हे मोहिते यांचे मुळगाव आहे. नोकरीनिमित्ताने विद्यानगर येथील गुरूदत्त कॉलनीत गेल्या अनेक वर्षापासून स्थायिक झाले होते. शिवाजी मोहिते हे एसटी आगारात नोकरीस होते. ते सध्या निवृत्त आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलगा नोकरीनिमित्ताने पुणे येथे असतो. तर मुलगी वृषाली हिचा दोन महिन्यापूर्वी नऊ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. वाघोली - वाठार स्टेशन ही मुलीची सासुरवाडी आहे. गेल्या काही काही दिवसांपासून मुलगी माहेरीच होती. आज दुपारी सौ. वृषालीने अचानक विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

ती घरातील कोचवर निपचीप पडली होती. ती काहीच बोलत नसल्याने तिच्या आई वडीलांनी तिला हलवून पाहिले. मात्र मुलीने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची आई- वडिलांची खात्री झाली. त्यावेळी त्वरीत त्यांनी मुलाला पुण्याला फोन करून घडला प्रकार सांगितला.

त्याचवेळी आई- वडिलांनी रडारड सुरू केली. त्यावेळी मुलाने फोन कट करून विद्यानगर येथील मित्रांना घरी जावून पाहण्यास सांगितले. मित्र मोहिते यांच्या घरी पोचेपर्यंत त्याच्या आई-वडीलांनी घरातील सिलींग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.