Breaking News

राजकारणाचा पोरखेळपणा


लोकसभेच्या सातारा मतदारसंघात आघाडी आणि युतीच्या दोन तगड्या उमेदवारांच्या प्रचाराचा गावोगावी धुरळा उडत असताना जनतेची मात्र मोठी करमणूक होत आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना-भाजप व मित्रपक्षाच्या महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये आगळीक होत असल्याचे दिसून येत आहे. प्रचारात विकासाच्या मुद्यांवर कमी तर इतर फालतू विषयांवर अधिक बोललं जात आहे. 

एवढेच नव्हे आपण कसे वेगळे आहोत हे दाखविण्याची चढाओढ सुरु आहे. हे करीत असताना आपल्याकडून होत असलेल्या पोरकट वर्तनाचं हसू होतयं याचेदेखील दोघांनाही भान नसावे. नरेंद्र पाटील यांचं मिसळ पुराण अद्याप संपलं नाही. त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार व उदयनराजेंचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले यांची गळाभेट घेवून सातारचे फक्त तुम्हीच राजे आहात असे म्हणत एकप्रकारे उदयनराजेंची खोडच काढली. या प्रकारानंतर उदयनराजे प्रत्युत्तरादाखल काहीच न करता गप्प राहतील तर ते कसेल उदयनराजे? त्यांनी लगेचच शिवेंद्रराजेंना भेटून प्रेमाची पप्पी की झप्पी दिली. प्रचारादरम्यानच्या सर्वच सभांमध्ये आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कॉलर उंचावत आपला नाद करायचा नायं असंच उदयनराजे सांगत आहेत.

 एकीकडे छत्रपतींचे वंशज असलेले व गेली दहा वर्षे खासदार म्हणून कार्यरत असलेले उदयनराजे तर दुसरीकडे माथाडी कामगारांचे नेते असलेल नरेंद्र पाटील हे दोघांचीही संपत्ती करोडोंच्या घरात आहे. यांनी प्रामाणिकपणे मनात आणले तर जिल्ह्याचा चांगला विकास होवू शकेल. त्यांच्यात तेवढी धमक नक्कीच आहे. परंतु, विकासाच्या मुद्यांवर बोलण्याऐवजी या दोन्ही उमेदवारांनी राजकारणाचा पोरखेळ केला असल्याने जनतेची करमणूक होत असली तरी शेवटी हा प्रकार घातकच आहे, असे म्हणावे लागेल.