Breaking News

अग्रलेख- संशयाचे ढग


जगात शस्त्रास्त्रांची मोठी बाजारपेठ आहे. त्यात काही देशांच्या कंपन्या बाजारपेठ मिळवण्यासाठी दलालांची नियुक्ती करतात. त्यासाठी मोठे कमिशन देतात. काही देशांत अशा कमिशन स्वीकृतीला राजमान्यता असते. आपल्याकडे मात्र तिची संभावना लाच म्हणून केली जाते. शस्त्रास्त्र उत्पादक कंपन्यांची गळेकापू स्पर्धा इतक्या थराला गेली आहे, की संबंधित देशातील लष्करी अधिकारी, राज्यकर्त्यांना हाताशी धरून आपलीच शस्त्रास्त्रे कशी खरेदी केली जातील, यावर त्यांचा भर असतो. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद संबंधित कंपन्यांनी केलेली असते. आता आपली शस्त्रसामुग्री खरेदी केली नाही आणि दुसर्‍या कंपन्यांची केली, की ती कशी जास्त किमंतीत केली, ती कशी निकृष्ट आहेत, त्यासाठी कशी लाच दिली असा कांगावा करायला अशा कंपन्या तयार होतात. काँग्रेसच्या काळात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी करावयची होती. या हेलिकॉप्टरचे उड्डाण किती उंचीवरून असायला हवे, याचे काही निकष होते; परंतु ते निकष बाजूला ठेवून ऑगस्टा वेस्टलँड कंपनीची हेलिकॉप्टर खरेदी करण्यात आली. 

या खरेदीत सुमारे 360 कोटी रुपयांची लाच दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. ही लाच हवाई दलाचे तत्कालीन प्रमुख एस. पी. त्यागी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यागी यांच्या कुटुंबाचा त्यात सहभाग होता. काँग्रेसच्याच काळात जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले, तेव्हा काँग्रेसनेच या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला. संबंधित कंपनीला दिलेली रक्कम परत घेण्यात आली. तेव्हापासून या प्रकरणाचे राजकीय भांडवल करण्याचे काम चालू आहे. ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यात सरकारी अधिकारी गुंतले होते. त्यात राजकीय नेत्याचा समावेश नव्हता, असे आतापर्यंत सांगितले जात होते; परंतु ख्रिश्‍चन मिशेलला जेव्हा संयुक्त अरब अमिरातीतून भारतात आणण्यात आले, तेव्हापासून ऑगस्टा वेस्टलँड कंपनीने गांधी कुटुंबीयांना दलाली दिल्याचा संशय निर्माण करण्यात आला.

देशाच्या राजकारणात गांधी कुटुंब प्रदीर्घ काळ राहिले आहे. त्यांच्याविरोधात आतापर्यंत बोफोर्ससह अन्य अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले; परंतु आतापर्यंत एकही आरोप सिद्ध झालेला नाही. संशयाचे ढग मात्र निर्माण झाले. त्याची किमंत या कुटुंबावा मोजावी लागली. मिशेल याला भारताने प्रत्यार्पण करून ताब्यात घेतले, तेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी त्याचे राजकीय भांडवल करायला सुरुवात केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीत मोदी यांनी तेव्हा मिशेलच्या चिठ्ठ्या आणि त्याचे तुरुंगातील गौप्यस्फोट गांधी कुटुंबाची झोप उडवील, असे म्हटले होते. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यात खरेच गांधी कुटुंबाचा सहभाग असेल, तर त्याची वाट न पाहता पुराव्यानिशी लगेच तो उघड करून टाकायला हवा. आता मिशेलला अटक होऊन पाच महिने झाले, तरी त्याच्या तोंडून थेट गांधी कुटुंबाचे नाव आलेले नाही. एपी, एफएएम, आरजी अशा सांकेतिक आधारावर किती दिवस राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करायचा? त्याऐवजी हा सूर्य आणि हा जयद्रथ हे एकदाचे होऊन जायला हवे. मोदी यांनी गोंदियाच्या सभेत राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना असेच नाव न घेता टार्गेट केले. तिहारच्या तुरुंगातील व्यक्तीच्या जवळ राष्ट्रवादीविरोधात काही पुरावे असतील, तर त्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचीही तिहारमध्ये रवानगी करायला कुणाचाच आक्षेप असण्याचे कारण नाही; परंतु मग निवडणूक येईपर्यंत मोदी काय मुहूर्ताची वाट पाहत बसले होते का, असा प्रश्‍न निर्माण होतो. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील दलाल ख्रिश्‍चन मिशेल याच्याविरोधातही लाच दिल्याचा आरोप आहे. आरोपपत्र दाखल झाले, म्हणजे गुन्हा सिद्ध झाला असे होत नाही. दिल्ली न्यायालयात आरोपपत्र सादर झाल्यानंतर मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गांधी कुटुंब आणि सोनिया गांधी यांचे माजी राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी फक्त सहा दिवस उरले असताना आरोपपत्रावर सुनावणी सुरू झाल्याने भाजपला प्रचारात काँग्रेसविरोधात राजकीय ‘हत्यार’ मिळाले आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या आरोपपत्रातील माहिती प्रसारमाध्यमांना उपलब्ध झाली. त्यामुळे आरोपपत्रात अहमद पटेल आणि कोणीएक ‘मिसेस गांधी’ यांची नावे असल्याचे उघड झाले. ‘फुटलेल्या’ आरोपपत्राचा आधार घेत मोदी यांनी डेहराडून येथील जाहीर सभेमधून थेट गांधी कुटुंबावर टीका केली. 

आरोपपत्रातील कुटुंब (फॅमिली) म्हणजे कोणत्या कुटुंबाशी मिशेलचे जवळचे संबंध होते? हेलिकॉप्टर खरेदीतून कोणत्या कुटुंबाचा लाभ झाला, असा सवाल करत मोदींनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. काँग्रेस आणि भ्रष्टाचार हातात हात घालून वावरतात. मोदी यांनी अहमद पटेल यांचाही उल्लेख केला. पंतप्रधान होण्याची मनीषा बाळगणार्‍यांनी भ्रष्टाचाराच्या इतक्या गंभीर प्रकरणात मौन बाळगले आहे. देशाला त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची गरज नाही, असे त्यांना वाटते का? आरजी, एपी, फॅम ही काल्पनिक नावे वाटतात का, असा सवाल करत जेटली यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आरजी (राहुल गांधी) यांना पन्नास कोटी रुपयांची लाच दिल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला असला, तरी आरोपपत्रांत मात्र राहुल गांधी यांचे थेट नाव घेण्याचे टाळले आहे. नंतर मात्र मिशेल याने आपण कोणाचीही नावे घेतली नाही, असे म्हटल्याने भाजप तोंडघशी पडला आहे. आरोपपत्रांत मिशेलच्या पत्राचा हवाला देत तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यावर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी दबाव टाकल्याचे म्हटले आहे. तसेच राजकीय व्यक्ती आणि वायुदलातील अधिकार्‍यांना लाच म्हणून 30 मिलियन डॉलर दिल्याचा उल्लेख केला आहे. 2004 ते 2016 या काळात आरजी नामक व्यक्तीला 50 कोटी रुपयांची लाच दिल्याचे म्हटले आहे; पण आरजी म्हणजे कोण? हे सांगण्यास मात्र मिशेलने नकार दिला आहे. 

2010 मध्ये 3 हजार 600 कोटी रुपयांचा हा करार करण्यात आला होता; पण 2014मध्ये भारत सरकारने हा करार रद्द केला होता. करार रद्द झाल्यानंतर 360 कोटी रुपये लाच दिल्याचा आरोपाखाली सध्या मिशेेलची चौकशी सुरू आहे. मिशेल याने लाचखोरीचा हिशेब असलेल्या ‘डायरी’त नोंद केलेल्या संक्षिप्त नावांचा गौप्यस्फोट केला आहे. आरोपपत्राचा आधार घेत मोदी आणि जेटली यांनी गांधी कुटुंबाला लक्ष्य केले; मात्र मिशेल याने न्यायालयातील सुनावणीच्या वेळी घूमजाव करीत आपण ‘ईडी’ला दिलेल्या जबानीत कोणाचेही नाव घेतलेले नसल्याचा दावा केला. न्यायालयाने दखल घेण्याआधीच आरोपपत्राच्या प्रती प्रसारमाध्यमांना कशा मिळाल्या, असा सवाल मिशेलच्या वकिलांनी न्यायालयात केला. केंद्र सरकार राजकीय लाभासाठी तपास यंत्रणांचा वापर करीत असल्याचा आरोप मिशेलच्या वकिलांनी केला. आपल्यालाही आरोपपत्राची प्रत मिळाली नसताना प्रसारमाध्यमांना मात्र त्यातील माहिती आधी उपलब्ध करून देण्यात आली, असे मिशेलच्या वकिलाने न्यायालयात सांगितले. या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने ‘ईडी’ला नोटीस बजावली आहे.