Breaking News

पर्यटकांना सुरक्षित मार्गाची माहिती देणार; काश्मीर पोलिसांचा उपक्रम; पर्यटनवाढीसाठी प्रशासनाची नवी योजनाश्रीनगरः काश्मिरात पर्यटनासाठी जाताना कुठला मार्ग सुरक्षित आहे, याची आता ‘रिअल टाइम’ माहिती स्थानिक पोलिसांकडून वेळोवेळी दिली जाणार आहे. सुरक्षेच्या भीतीपोटी पर्यटकांनी खोर्‍याकडे पाठ फिरवल्यानंतर आता प्रशासनाने नवीन कार्यपद्धतीचा अवलंब केला आहे.

काश्मीर खोरे दहशतवादी घटनांखेरीज दगडफेकीच्या घटनांमुळे कुप्रसिद्ध आहे. या स्थितीत सुरक्षेची हमी देण्यासाठी पर्यटन विभागाने कार्यपद्धतीत बदल केला आहे. त्याअंतर्गत पोलिसांपासून ते शिकारा चालकांपर्यंत प्रत्येकाशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. यासाठी एक स्वतंत्र रचना विभागाने उभी केली आहे. त्याअंतर्गत ‘पर्यटकांची सुरक्षा’ या एकमेव लक्ष्यासह पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याची पर्यटन विभागात प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.

काश्मिरात पर्यटक एकटा नाही. येथे पर्यटन सर्व विभागांशी संलग्न आहे. त्यामुळेच काश्मिरात दाखल झालेले पर्यटक कुठे-कुठे फिरायला जाणार आहेत, याची माहिती विभागाकडे आधीच येते. ही माहिती आली, की पर्यटकांना त्या भागात जाण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित रस्ता सुचवला जातो. यदाकदाचित त्या रस्त्यावर अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ संबंधित टूर ऑपरेटरशी संपर्क साधला जातो व दुसरा सुरक्षित रस्ता पर्यटकांना सांगितला जातो. पर्यटकांच्या मार्गावर तणावपूर्ण स्थिती निर्माण होत असल्यास त्याची माहितीही आधी मिळते. त्यानुसार योग्य नियोजन पर्यटकांच्या टूर ऑपरेटर्सना करून दिले जाते. त्यामुळे सुरक्षित पर्यटन शक्य होते.
देशाच्या अन्य भागात पर्यटक हा स्थानिक प्रशासनाशी संलग्न नसतो. काश्मिरात मात्र आता प्रत्येक पर्यटकावर प्रशासनाची देखरेख आहे. जसे महाराष्ट्रातील एखाद्या टूर ऑपरेटरने सहल आखली, की त्याची माहिती आधी पर्यटन विभागाकडे जाते. पर्यटक जिथे राहणार आहेत, त्या हॉटेलपासून पर्यटनाशी संबंधित प्रत्येक घटक विभागाशी थेट संपर्कात असतो. विभागातील कर्मचारी-अधिकारी पोलिस प्रशासन व लष्कराशी संपर्कात असतात.

चित्रपट पर्यटन सुरू करणार

“काश्मीरच्या पर्यटनाबाबत खूप गैरसमजुती आहेत; पण सुयोग्य नियोजन केल्यास पर्यटन 100 टक्के सुरक्षित आहे. येथे पर्यटन विभागाची कार्यपद्धतीदेखील सुरक्षेची हमी देणारी आहे. आता येत्या काळात काश्मिरात चित्रपट पर्यटन कसे सुरू करता येईल, याबाबत अभ्यास केला जात आहे.’’
-अभिजित पाटील, पर्यटन व्यावसायिक