Breaking News

आमदार सत्तारांचे बंड शमले काँग्रेसला मदतीबाबत मौन

औरंगाबाद / प्रतिनिधीःकाँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांचे बंड शमले आहे. सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता; मात्र त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

सुभाष झांबड यांना औरंगाबाद मतदार संघातून लोकसभेची उमेदवारी दिल्याने सत्तार नाराज होते. अपक्ष म्हणून निवडणूक लढली तरी जिंकण्याची शक्यता फार कमी होती. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना झाला असता. त्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. आता ते कोणाच्या पाठीमागे उभे राहणार, काँग्रेसला मदत करणार की नाही? यासंदर्भात येत्या सात दिवसात निर्णय घेणार आहेत. गेल्या काही दिवसांत काँग्रेसवर नाराज असलेल्या सत्तार यांनी दोनदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. सत्तार यांनी आपल्या मुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार करण्याची अट मुख्यमंत्र्यांकडे घातली; मात्र या जागेसाठी आधीच कुणालातरी आश्‍वासन दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.