Breaking News

पोलीस बंदोबस्तात नाणेगावचा रस्ता खुला


कराड / प्रतिनिधी : चाफळ विभागातील नाणेगाव खुर्द ते चव्हाणवाडी या जिल्हा ग्रामीण मार्ग 118 या रस्त्यावरच नाणेगाव खुर्द मधील एकाने दावा सांगत तारेचे कुंपण घालत रस्त्याचाच ताबा घेतला होता. यावेळी संबंधितांपुढे प्रशासनानेही हात टेकले होते. याची तात्काळ दखल घेत तहसिलदार रामहरी भोसले यांनी नाणेगावला भेट देत दोनच दिवसात निर्णय देण्याचे आश्र्वासन ग्रामस्थांना दिले. त्यानुसार शनिवारी पोलीस बंदोबस्तात सदरच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

नाणेगाव खुर्द गावच्या हद्दीत गावातीलच एकाने रस्त्याची जागा आपली असल्याचा दावा करीत रस्त्यावरच तारेचे कुंपण टाकल्याने गावचा व त्यापुढील चाहुरवाडी, कवठेकरवाडी, सुर्याचीवाडी या सर्व गावांचा दळणवळणाचा मार्ग बंद झाला होता. परिणामी नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. रस्ता बंद असल्याने आजारी माणसांनाही आरोग्यसेवा वेळेत मिळत नव्हत्या. तर रस्त्याअभावी शालेय विद्यार्थ्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यावरील अतिक्रमण काढावे यासाठी याबाबत तहसिलदारांना नवनिर्वाचित सरपंच विक्रम कुंभार, उपसरपंच वैभव मुळगावकर, ग्रामसेवक राजू थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी तहसीलदारांपुढे आपले गर्हाणे मांडले. यावेळी तहसिलदारांनी गावात भेट देवून तलाठ्यांना सुचना केल्या. त्यानुसार शनिवारी उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलीस बंदोबस्तात सदरचे रस्त्यावरील अतिक्रमण काढून घेतले. 
 
तहसिलदार रामहरी भोसले यांच्या आदेशानुसार तलाठी ए. जे. सय्यद, ग्रामसेवक राजू थोरात, पोलीस पाटील अविनाश कुंभार, सरपंच विक्रम कुंभार, उपसरपंच वैभव मुळगावकर, तात्यासो लोंढे, कोतवाल शंकर गुरव यांनी अतिक्रमण हटाव मोहीमेची कार्यवाही केली. रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.