Breaking News

जुन्याच घोषणांचा पाऊस; भाजपचा संकल्पनामा; शेतकरी, व्यापार्‍यांना पेन्शन; एक लाखांच बिनव्याजी कर्ज


नवी दिल्लीः दिल्लीत भाजप जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. संकल्पपत्र असे या जाहीरनाम्याला नाव देण्यात आले आहे. जुन्याच घोषणांचा पाऊस या जाहीरनाम्यात पाडण्यात आला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याला शह देताना राष्ट्रीय सुरक्षेवर भर देणार्‍या घोषणा त्यात करण्यात आल्या आहेत.

जाहीरनाम्यात राम मंदिराचा पुनरूच्चार करण्यात आला. शेतकर्‍यांना 60 वर्षानंतर पेन्शन देणार अशी घोषणा भाजपने केली आहे. शिवाय, देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही असे भाजपने स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी कठोर पावले उचलू असे, या संकल्पपत्रात म्हटले आहे. एक लाखापर्यंतच्या कृषीकर्जावर 5 वर्षापर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही, असे भाजपने म्हटले आहे. छोट्या शेतकर्‍यांना दरवर्षी 6 हजार रुपये किसान सन्मान निधी देण्याची घोषणा भाजपने अर्थसंकल्पातच केली होती. तिचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, राजनाथ सिंह यांची या वेळी भाषणे झाली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या वेळी उपस्थित होत्या.

आपल्या जाहीरनाम्यात भाजपने सर्व रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण 2022 पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे. सर्व घरांमध्ये वीज, शौचालय देण्याचे आश्‍वासन देखील भाजपने दिले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्याचे जाहीर केले आहे. छोट्या दुकानदरांनादेखील 60 वर्षानंतर पेन्शन दिली जाईल, असे भाजपने आपल्या संकल्पपत्रात म्हटले आहे. शिवाय, राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करण्याचे आश्‍वासन दिले आहे.


भाजपच संकल्पपत्र 2024 साठी आहे; पण स्वातंत्र्याला 75 वर्षपूर्तीनिमित्त 2022पर्यंत ही आश्‍वासने पूर्ण करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, असे मोदी यांनी सांगितले. देशाला प्रगतीपथावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘वन मिशन, वन डायरेक्शन’ ने आम्ही पुढे जाणार आहोत. देशात अनेक भागात पाण्याची समस्या गंभीर आहे. याबाबत ठोस पाऊल उचलण्याच गरज आहे. यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. एनडीए सरकारचा 2014 ते 2019 चा कार्यकाळ भविष्यात सुवर्ण अक्षरांत लिहिला जाईल. भाजप सरकारने देशातील अस्थिर वातावरण संपवले. आज देश महाशक्ती म्हणून समोर येत आहे. 2014 साली भारताची अर्थव्यवस्था 11 व्या क्रमांकावर होती, ती आज सहाव्या क्रमाकांवर आहे.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्त्वाचे मुद्दे

*संकल्पपत्रात राम मंदिराच्या निर्मितीचा पुनरुच्चार
*75 वैद्यकीय महाविद्यालये, विद्यापीठ स्थापन करणार
* व्यवस्थापन, अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील जागा वाढवणार
*सूक्ष्म, लघु आणि मध्यमांसाठी 1 लाख कोटींच्या क्रेडिट गॅरंटीची योजना
*कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी 25 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक
*1 लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावर 5 वर्षांपर्यंत व्याज नाही
*तीन तलाकविरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय देणार
* 50 शहरांमध्ये मेट्रोचं नेटवर्क मजबूत करणार
*पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटी रुपये गुंतवणूक करणार
* पाच किमी अंतरात बँकिंग सुविधा

काश्मीरसंबंधीचे 35 ए रद्द करणार

पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे 35 ए कलम रद्द करणार असल्याचे भाजपतर्फे जाहीर करण्यात आले आहे. आम्ही कलम 35 ए संपवण्यासाठी कटीबद्ध आहोत. जम्मू आणि काश्मीरला लागू होणारे 35 ए हे स्थानिक नसलेल्या तसेच महिलांबाबत भेदभाव करणारे आहे. हे कलम म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या विकासात बाधा आहे. आम्ही काश्मिरी पंडितांच्या सुरक्षिततेसाठीही प्रयत्न करणार असल्याचेही यात जाहीरनाम्यात म्हटले आहे.