Breaking News

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या बेफिकिरीमुळे रुग्णाचे हाल


सातारा / प्रतिनिधी - जिल्हा शासकीय रुग्णालयातील दंतचिकित्सा विभाग गप्पाचा अड्डा बनला आहे. कंत्राटी डॉक्टरांच्या अंगावर कामाचा बोजा टाकून स्वतः वरिष्ठांच्या कार्यालयात चकाट्या पिटणार्‍यांची संख्या वाढल्याने या ओपीडीत येणार्‍या रुग्णांची ससेहोलपट होत आहे. या विभागात दंत उपचारासाठी सध्या एकच खुर्ची उपलब्ध असल्याने या विभागाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.

समांतर खुर्चीची महत्वाकांक्षा ठेवणार्‍या काही पुढारी डॉक्टरांच्या आश्रयाने हे जिल्हा रुग्णालय खासगी जहागिरी असल्याप्रमाणे येथे अविर्भाव असतो. साधन सुविधांची कमतरता आणि दंतचिकित्सा विभाग सोडून नको त्या विभागात विनाकारण कुचाळक्या करण्याच्या सवयींमुळे या विभागात साठ पैकी वीसच पेशंटवर उपचार होतात. दंतचिकित्सेची पदव्युत्तर पदवी घतलेली एक महिला वैद्यकीय अधिकारी व दोन पदवी घेतलेले असे तीन डॉक्टर या विभागात उपलब्ध आहेत. मात्र, दोन कंत्राटी व एक कायमस्वरूपी अशी व्यवस्था असल्याने येथे मनमानीसुध्दा जास्त चालत आहे.

किरकोळ उपचारांसाठीही रुग्णांना चार वेळा हेलपाटे मारायला लावायची येथील परंपरा अगाध असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची योग्य मार्गदर्शनाअभावी त्रिस्थळी यात्रा सुरू असते. वरिष्ठ पदाची दादागिरी आणि गटबाजी प्रचंड आणि त्यातही सिनइर आणि ज्युनियर्स डॉक्टरांचा जनरेशन गॅप प्रचंड असल्याने रुग्णसेवेचे हे पवित्र केंद्र अर्ंतगत लाथाळ्यांचा अड्डा बनला आहे. मात्र इथे कामच होत नाही, असे नाही. काही कार्यकुशल वैद्यकीय अधिकार्‍यांनी दंतचिकित्सा विभाग डेंटल चेअर खराब असतानाही नेटाने चालवला आहे. ज्या रूग्णांना 8 ते 10 दिवस वाट पाहायला लागायची त्या रूग्णांना अवघ्या तीनच दिवसात पुनर्तपासणीसाठी बोलावले जाते.
रूट कॅनॉल, मायनर सर्जिकल प्रोसेस या सगळ्याच छोट्या मोठ्या चिकित्सांची जबाबदारी एका महिला डॉक्टरकडे आहे. आणि त्या ती जबाबदारी नेटाने सांभाळत आहेत. दंतचिकित्सा विभागात आणखी एका डेंटल चेअरची गरज आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी परवानगी देवूनही कोरेगाव प्राथमिक केंद्रातील अडगळीत पडलेली डेंटल चेअर सातार्‍यात आणण्यासाठी हस्ते-परहस्ते टाळाटाळ केली जात आहे. काही दिवसांपूर्वी ती दखलही झाली. मात्र, यामागेही काही डोकेबाज अधिकार्‍यांचा कंपू आहे. चमकोगिरीत पुढे पुढे करणारे काही सिनइर्स कंत्राटी तत्वावरच्या डॉक्टरांना दुय्यम वागणूक देऊन त्यांना जाहीर कार्यक्रमात मुद्दाम मागील खुर्चीवर बसवतात. कौतुकासाठी सिनइर्स आणि कामाच्या ओझ्यासाठी ज्युनइर्स हा दंतचिकित्सा विभागाचा सरळ सरळ फंडा आहे.