Breaking News

राजू शेट्टीविरोधात गुन्हा दाखल आक्षेपार्ह वक्तव्य भोवले

राजू शेट्टी साठी इमेज परिणाम

हातकणंगले : लोकसभा निवडणूकीच्या प्रचारसभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि हातकणंगले येथील महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
हातकणंगले पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा भंग आणि लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 च्या कलम 125 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरारी पथक क्रमांक तीनचे प्रमुख मेघराज घोडके यांनी याबाबतची फिर्यादी दिली आहे. हातकणंगले येथील हेरले ग्रामपंचायतीसमोर 2 एप्रिलला झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी, ‘सीमेवर आमची पोरं जातात, कुण्या देशपांडे-कुलकर्ण्यांची नाहीत. कुलकर्णी, देशपांडे, जोशी आडनावाच्या व्यक्ती सैन्यात कधीच भरती होत नाहीत, शेतकर्‍यांचीच मुले सैन्यात असतात’, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल विविध संघटनांनी शेट्टी यांच्याविरोधात संताप व्यक्त केला. अनेक संघटनांनी निवडणूक आयोग तसेच निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. या सर्व पार्श्‍वभूमीवर हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांनी शेट्टी यांना शुक्रवारी नोटीस बजावली. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवर आपला खुलासा 24 तासांत सादर करावा, असेही या नोटीसमध्ये स्पष्ट केले होते. शेट्टी यांना बजावल्यानंतर शनिवारी सायंकाळपर्यंत त्यांचा खुलासा अपेक्षित होता. मात्र रात्री उशीरापर्यंत शेट्टी यांनी नोटीसला उत्तर दिले नाही. यामुळे अखेर शेट्टी यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अन्वये गुन्हा नोंद करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी काटकर यांनी दिले आहे. त्यानुसार हातकणंगले पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खासदार शेट्टी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर समाजांमध्ये दरी निर्माण झाली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच जिल्ह्यात निवडणुकीत उमेदवार प्रथमच अशाप्रकारे गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पोलीस निरीक्षक एस.एल.डुबल तपास करीत आहेत.