Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणे बलात्कारचनवी दिल्ली : महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणे म्हणजे बलात्काराचा गुन्हा आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता महिलांची फसवणूक करणार्‍या घटनांना थोड्याफार प्रमाणात आळा बसणार आहे. 

महिलांची यापुढे कुणी फसवणूक केली तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होणार आहे. छत्तीसगडमधील पीडित महिलेने एका डॉक्टराच्या विरोधात याचिका दाखल केली होती. पीडित महिला आणि डॉक्टर यांच्यात प्रेमसंबंध होते. ते परस्परांना 2009 पासून ओळखत होते. डॉक्टरने महिलेला लग्नाचे आश्‍वासन दिले होते. डॉक्टर आणि महिला दोघांच्या घरी त्यांच्या प्रेमप्रकरणाविषयी माहिती होती. डॉक्टरने महिलेच्या कुटुंबियांनाही लग्न करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, डॉक्टरने दुसर्‍याच कुणाशी लग्न केले. त्यामुळे पीडित महिलेने कोर्टात धाव घेतली होती. पीडितेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. लग्नाचे आमीष दाखवून पीडितेशी शरीरसंबंध म्हणजे बलात्कारच, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एल. नागेश्‍वर राव आणि एमआर शाह यांच्या खंडपीठाने दिला आहे. अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.