Breaking News

कान्हूर पठार व परिसरात वादळी वार्‍यासह गारपीट


कान्हूर पठार/प्रतिनिधी : सोमवारी संध्याकाळी साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान कान्हूर पठार येथे वादळी वार्‍यासह जोरदार गारपिटीने शेतकरी व नागरीकांची त्रेधातिपिट उडवली. या गारपीटीने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला. या वर्षी मोठ्या प्रमाणात आंब्यास कैर्‍या आल्या होत्या. या वादळात व गारपिटीत कैर्‍या मोठ्या प्रमाणात गळून पडल्या. कान्हूर येथील शेतकरी आण्णासाहेब सोनावळे यांच्या 70 ते 80 गावरान कोंबड्या या गारपिटीत मृत्युमुखी पडून हजारो रुपयांचे नुकसान झाले. ज्या शेतकर्‍यांकडे थोडेफार पाणी होते. त्यांनी कांदा बियानासाठी ढेंगळ्यांची लागवड केलेली होती. या अवकाळी वादळी गारपिटीने या ढेंगळ्याचे संपूर्ण नुकसान होऊन पुढील वर्षीच्या कांदा बियाणाच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता शेतकर्‍यांनी बोलताना व्यक्त केली. विजांच्या गडगडाटासह आलेल्या या पावसाने सर्वत्र धांदलीचे वातावरण तयार झाले. या वेळी टाकळी ढोकेश्‍वर व पारनेर परिसरात ही वादळी पाउस झाल्याची माहिती मिळाली आहे.