Breaking News

पालकमंत्र्यांविरोधात कर्जतला नाराजांची टीम एकवटली; पुढील बैठकीत अंतिम निर्णय होणार ; राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता


कर्जत/प्रतिनिधी
गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अनेक नेतेमंडळींनी एकत्र येवून पालकमंत्र्यांविरोधात रान पेटवणे सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील मोठ्या संख्येने पदाधिकारी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या विरोधात एकवटल्याने त्यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चला करूया परिवर्तन ग्रुपची स्थापना करून त्यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. पंचायत समितीचे माजी सभापती नानासाहेब निकत यांच्या आंबिजळगाव येथील निवासस्थानी ही बैठक घेण्यात आली.
यावेळी नानासाहेब निकत पालकमंत्री शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त करत म्हणाले की, मी मागच्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष होतो. आम्ही अजित पवार यांची भेट घेऊन तुम्ही कर्जतला उमेदवारी करावी अशी मागणी केली होती. परंतु पवारांनी राजेंद्र फाळके यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन प्रा.राम शिंदे यांच्याशी चर्चा केली व मदत करू असे सांगितले होते.


त्यावेळी राम शिंदेंनी आम्हाला सांगितले की, तुमची सर्व टिम भाजपात प्रवेश करून काम करा. तुम्हाला पक्षात मोठा मानसन्मान देऊ. तुम्ही सुचवलेली कामे मार्गी लावू असे आश्‍वासनही दिले. शिंदे यांच्या शब्दावर विश्‍वास ठेऊन आम्ही भाजपात प्रवेश केला. शिंदे निवडून आले, मंत्री झाले. मात्र, आजपर्यंत साडेचार वर्षात आम्हाला कधीच विश्‍वासात घेतले नाही. विविध विकास कामे घेवून तसेच वेळोवेळी पत्रव्यवहार केला. परंतु शिंदे यांनी त्या पत्रांना न वाचताच केराची टोपली दाखवली. तसेच आम्ही दिलेली काही पत्रे त्यांचे बगलबच्चे त्यांच्यापर्यंत पोहचू देत नव्हते, असेही निकत यांनी बैठकीत स्पष्ट केले. शिंदे यांनी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे ऐकून आम्हाला आजपर्यंत दुजाभावाची वागणूक दिली. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

यावेळी बोलताना अशोक जायभाय म्हणाले की, राम शिंदे यांनी मागच्या वर्षी कर्जतला राज्यस्तरिय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी आम्हाला या स्पर्धेबाबत साधी विचारपूस देखील केली नाही. आम्हाला पास सुद्धा दिले नव्हते. उलट एकाच कुटुंबातील चार-चार व्यक्तींना व्हीआयपी पास देऊन स्टेजवर मुख्यमंत्र्यांचे शेजारी बसण्याची व्यवस्था पालकमंत्री राम शिंदे यांनी केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. दुरगावचे सरपंच अशोक जायभाय, शिवाजी अनभुले, सुनिल शेलार, खातगावचे सरपंच चंद्रकांत आटोळे, रामचंद्र खराडे, बाबासाहेब कोपनर, आबा गोरखे, बबन नेवसे, नाथा गोरे, अतुल झगडे, पप्पू शेख, महादेव खानवटे, एकनाथ दराडे, अंबर भोसले, माऊली सायकर, दादा परदेशी, राहुल अनारसे, कांतीलाल लोंढे, किशोर पवार, संदीप मोरे, लक्ष्मण खानवटे, गजेंद्र यादव, दत्ता चव्हाण, नरेंद्र ढेरे, राहुल खराडे, इकबाल काझी आदी या बैठकीस उपस्थित होते.