Breaking News

दखल- उमेदवारप्रेम वरालाच जेव्हा तुरुंगवारी घडवितं...!

निवडणूक जाहीर झाली, की अंगात वारं संचारतं. नव्या नव्या युक्त्या, प्रयुक्त्या वापरल्या जातात. उमेदवाराप्रती निष्ठा दाखवण्याची जणू स्पर्धा लागते. उमेदवार आणि पक्षावर निष्ठा जरूर असावी; परंतु ती दाखविताना ही निष्ठा तुरुंगवारी घडविणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. पारनेर तालुक्यातील निघोजच्या वराला अशी निष्ठा थेट एक दिवसाची तुरुंगवारी घडविण्यास कारणीभूत ठरली.
लोकसभा, विधानसभा किंवा अन्य कुठलीही निवडणूक असली, की काही लोकांच्या जणू अंगात येतं. काही तरी वेगळं करण्याची टूम निघते. कार्यकर्त्यांत उत्साह असावा. काहीतरी वेगळं करण्याची धडपडही असावी; परंतु ते करताना आचारसंहितेचा भंग तर करीत नाही ना, याचं भान ठेवायला हवं. काही लोक वाहनांवर क्रमांकाऐवजी पक्षाचं चिन्ह रंगवून घेतात, ते ही गैरच आहे. काही लोक उमेदवाराचं नाव, पक्षाचं चिन्ह गोंदवून घेतात. केस कापतानाही पक्षाच्या चिन्हासारखा आकार ठेवून बाकी केस काढले जातात. मोबाईलची रिंगटोन पक्षाच्या, उमेदवाराच्या कोडकौतुकाची असते. काही जण तर निवडणूक ज्वरानं एवढे ग्रासलेले असतात, की त्यांना त्यांच्या आवडीच्या उमेदवारावर केलेली टीकाही सहन होत नाही. काही ठिकाणी त्यातून मारामार्‍या झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. काही तर उमेदवाराचं वकीलपत्र घेतल्यासारखं भांडत असतात. वकिली करतात. समाज माध्यमात प्रतिक्रिया व्यक्त करणार्‍यांची, ट्रोलिंग करणार्‍यांची फौज तयार झाली आहे. निवडणूक ज्वर भल्याभल्यांची मती गुंग करतो. राजकारणातले प्रतिस्पर्धी एकत्र येतात. त्यांना कधी कधी पक्षही बदलावे लागतात; परंतु कार्यकर्त्यांचं तसं नसतं. नेते कधीच मार खात नाहीत. तुरुंगवारी करण्याची अपवादात्मक वेळ काहींवर आलेली असते; परंतु कार्यकर्ते मात्र कायम हमरीतुमरीवर येतात. 

आपल्या नेत्यासाठी डोकी फोडून घेतात. नेता अशा कार्यकर्त्यांच्या दुखर्‍या जखमेवर किती वेळा फुंकर घालतो, हा संंशोधनाचा मुद्दा ठरेल. त्यामुळं आता खरंतर कार्यकर्त्यांनीही सजग होण्याची वेळ आली आहे. अतिप्रेम संकटात नेई, असं एक वचन आहे. ते कायम ध्यानात घेतलं पाहिजे. पक्षावर, नेत्यावर निष्ठा असावी. त्याच्याबद्दल प्रेमही असावं. पक्षाच्या तत्त्वाबद्दल आदरही असावा; परंतु त्याचबरोबर इतरांबद्दल द्वेषाची भवना असता कामा नये. विरोधक हा विरोधक असतो. तो शत्रू नसतो, याचं भानही असायला हवं. अनेक निवडणुकांवरून खून होतात, मारामार्‍या होतात. निवडणूक ही लोकशाही मार्गानं जिंकायची असते. ते युद्ध नाही. अर्थात अलीकडच्या काळात निवडणुकीला ही कुरुक्षेत्रावरील युद्धाचं स्वरुप आलं आहे. ते तसं योग्य नाही. आपली लोकशाही सात दशकानंतरही प्रगल्भ झालेली नसेल, तर कुठं तरी चुकतं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.


लग्नपत्रिकाचा वापर खरंतर विवाहाचं निमंत्रण देण्यासाठी केलेला असतो. मूळ हेतू तरी तोच असतो. लग्नपत्रिकातून आता अनेकजण वेगवेगळे संदेश देत असतात. प्रबोधनही करीत असतात. ही चांगलीच लक्षण आहेत. लग्न हा सामाजिक सोहळा झाला आहे. त्यातून प्रबोधन होत असेल, तर त्याबाबत कुणाचाच आक्षेप असण्याचं कारण नाही; परंतु उत्साहाच्या भरात काही वेगळं करायला गेलं, की त्याचे परिणामही भोगावे लागतात. निवडणुकीच्या काळात विवाहाचा खर्च उमेदवारानं करणं, भोजनावळ्या घालणं असे प्रकार होतात. विवाहासाठी उमेदवार आणि त्याची यंत्रणा छुपी मदत करीत असते, हे आता नवीन राहिलेलं नाही. धनदांडगे उमेदवार तर अशा कामासाठी जास्तच प्रसिद्ध असतात. एकीकडं ही स्थिती असताना आता निवडणूक यंत्रणाही डोळ्यांत तेल घालून काम करायला लागल्या आहेत. उमेदवाराच्या खर्चावर त्यांचं जसं नियंत्रण असतं, तसंच एखाद्या कार्यक्रमातून प्रचार तर केला जात नाही ना, यावर करडी नजर असते. विवाह किंवा सामाजिक कार्यक्रमातूनही निवडणुकीचा प्रचार होत असतो. समाज माध्यमांचा दुरुपयोग होत असतो. निवडणूक आयोगाचं या सर्वांवर बारकाईनं लक्ष असतं. एखादी वेगळी घटना झाली, की माध्यम त्याचं वृत्तमूल्य लक्षात घेऊन लगेच कौतुकानं बातम्या द्यायला लागतात; परंतु अशा वेगळ्या घटनेतूनही आचारसंहितेचा भंग होतो आहे, हे कुणाच्या लक्षात येत नाही. आता निवडणुकीतील स्पर्धा आणि जागरूक कार्यकर्त्यांमुळं आचारसंहिता कक्षाकडं ही सातत्यानं तक्रारी येत असतात. त्यातून निघोजसारखी प्रकरणं उघडकीस येतात आणि आदर्श आचारसंहिता कशी मानगुटीवर बसते, हे लक्षात येतं. लग्नात भेटवस्तू नको, परंतु आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी डॉ. सुजयदादा विखे पाटील यांना जरूर मत द्या, अशी विनंती करणार्‍या निघोज येथील फिरोज शेख या उच्चशिक्षित तरुणावर तुरुंगाची हवा खाण्याची वेळ आली आहे! नेतेमंडळींना खूश करण्यासाठी अतिउत्साहाच्या भरात फिरोजनं केलेले हे कृत्य आचारसंहितेच्या कचाटयात सापडले आहे. लोकसभा निवडणूक निवासी उपजिल्हाधिकारी पाटील तसेच पारनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या आदेशान्वये फिरतं पथक अधिकारी शान मोहंमद शेख यांनी फिरोजविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिरोजला अटक होऊन एक दिवस तुरुंगवारी करावी लागली. आता त्याला जामिनावर सोडण्यात आलं असलं, तरी विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेतलं आवाहन कसं अंगलट आलं, हे त्यातून स्पष्ट झालं.


निघोज येथील निवृत्त पोस्टमास्तर अल्लाउद्दीन शेख यांचा मुलगा फिरोज याचा विवाह हसनापूर (ता. राहाता) येथील रेहमान पठाण यांची मुलगी मोसिना हिच्याशी 31 मार्च रोजी प्रवरानगर येथे पार पडला. या विवाहासाठी शेख यांनी छापलेल्या पत्रिकेमध्ये ‘किसी भी तरह का तोहफा मत दिजीए, मगर अपने सुनहरे कल के लिए डॉ. सुजय दादा विखे पाटीलजी को जरूर वोट दिजीए’ असं आवाहन करण्यात आलं होतं. फिरोज यानं छापलेल्या या पत्रिकेची जिल्ह्यात चांगलीच चर्चा झाली. देशपातळीवरील नामांकित वृत्तवाहिनीसह काही स्थानिक वृत्तपत्रांनीही त्याची दखल घेतली. विखे समर्थकांनीही ‘सोशल मीडिया’वर फिरोजची पत्रिका अपलोड करून डॉ. विखे यांच्यावर कार्यकर्त्यांचं किती प्रेम आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला. तोच आता अंगलट आला आहे. सासुरवाडी राहात्याची असल्यामुळं वरानं विखे यांच्यावर प्रेम व्यक्त केलं का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. फिरोज याचं हे कृत्य लोकसभा निवडणुकीसाठी नेमण्यात आलेल्या आचारसंहिता कक्षातील अधिकार्‍यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आलं. फिरोजच्या विवाहाची पत्रिका ताब्यात घेण्यात येऊन शान मोहंमद शेख यांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिरोज याच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस पथकानं तत्काळ कारवाई करीत त्यास अटक केली. त्यास पारनेर न्यायालयापुढं उभं केलं असता न्यायालयानं त्याची जामिनावर सुटका केली. सुटकेनंतर त्याला आणण्यासाठी विखे समर्थक गेले होते, हे खरं असलं, तरी त्यांनतर त्यांनी व्हॉटसअ‍ॅप तसंच अन्य माध्यमांवर या बातम्या पसरणार नाहीत, यासाठी प्रयत्न केले; परंतु ‘सोशल मीडिया’चा आवाकाच आता एवढा वाढला आहे, की वराची तुरुंगवारी व्हायरल झालीच.