Breaking News

निवडणुकीच्या वेळी येते मोदींच्या अंगात; शरद पवार यांची टीका; माझे घर भरलेले, मोदींच्या घरात कोणी नाही



बारामती / प्रतिनिधीः नरेंद्र मोदी यंदा पंतप्रधान होणार नाहीत. ते खासदार होतील, असे भाकीत राष्ट्रवादी ताँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. इतरवेळी मोदी चांगले असतात; परंतु निवडणुकीच्या काळात त्यांच्या अंगात येते, असा घणाघात करताना ज्यांच्या घरातच कुणी नाही, त्यांनी दुसर्‍यांच्या घरातल्या भांडणाबद्दल बोलू नये, असा टोलाही पवार यांनी मोदी यांना लगावला.

बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत पवार बोलत होते. त्याचबरोबर मी कधी कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही, तो ठेका मोदी यांनी घेतला, असेही ते म्हणाले.

येत्या 10 तारखेला पंतप्रधान हे बारामतीमध्ये आहेत, तेव्हा ते टीका करतीलच. काही दिवसांपूर्वी वर्ध्यात म्हणजेच बारामतीपासून 600-700 किलोमीटर लांब त्यांनी माझ्यावर टीका केली. हे काम त्यांच्याकडेच असल्याचा टोला पवारांनी लगावला.

माझ्या घरात भांडण आहे, हे मोदी यांना कसे काय समजले? मोदी साहेब आमचे घर भरलेले आहे. ज्यांच्या घरात कोण आहे का नाही, हेच दुसर्‍याला माहिती नाही, त्यांनी इतरांच्या घराबद्दल बोलू नये असे म्हणतात, असा चिमटाही पवार यांनी काढला.

मोदी आणि माझे संबंध चांगले आहेत. मी कधी कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही. हे त्यांनाही माहिती आहे. या वेळी मोदी पंतप्रधान नाही झाले, तरी कदाचित खासदार होतील. मीपण सध्या खासदार आहे. त्यामुळे भेटल्यावर मोदी यांना आमच्या कुटुंबाबद्दल नक्कीच माहिती देईन’, असा निशाणा पवार यांनी साधला.
मोदी यांनी दिल्ली, बारामती आणि वसंतदादा श्ाुगर इन्स्टिट्यूटमध्ये केलेल्या कौतुकाचा दाखलाही पवार यांनी दिला. मोदी यांची ती भाषण देशभरात गाजल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

आधी अवघड, आता निवडणूक सोपी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यंदाची निवडणुक अवघड वाटत होती; पण आता यश आपलेच याची खात्री झाली आहे. अशी भावना ट्विट करत व्यक्त केली आहे. पवार यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली, तरीसुद्धा त्यांनी आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी प्रचाराला सुरुवात केली आहे. पवार यांनी ट्विट करत यंदाची निवडणूक आपणच जिंकणार, अशी खात्री व्यक्त करत कार्यकर्त्यांनो जोमाने काम करा. असे आवाहन केले आहे.