Breaking News

भाजपच्या ‘शत्रू’ ला उमेदवारीची बक्षिसी काँग्रेसकडून पाटणा साहिबमधून उमेदवारी; मोदीवर ‘वन मॅन आर्मी’ची टीकासिन्हा यांना पाटणा साहिब येथून निवडणूक लढवण्याची इच्छा होती; मात्र या जागेवर भाजपने केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर नाराज झालेल्या सिन्हा यांनी भाजपला रामराम करत काँग्रेसप्रवेश केला. त्यामुळे पाटणा साहिब मतदारसंघात आता शत्रुघ्न सिन्हा आणि रविशंकर प्रसाद यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. काँग्रेसप्रवेश करताना सिन्हा यांनी भाजपचे दिवंगत संस्थापक नानाजी देशमुख, दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रशंसा केली. भाजपला सोडचिठ्ठी देताना दुःख होत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. 

भाजपमध्ये सध्या ‘वन मॅन आर्मी, टू मॅन शो’ सुरू आहे, अशा शब्दांत शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला आणि वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर सिन्हांनी उपस्थितांना संबोधित केले. भाजपला 39व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. भाजपमध्ये लोकशाहीचे हुकूमशाहीत रुपांतर होताना आपण पाहिले आहे असे ते म्हणाले. ‘भाजपतील वरिष्ठ नेत्यांना मार्गदर्शक मंडळात ढकलण्यात आले. या मार्गदर्शक मंडळाची एकही बैठक झाली नाही. अडवाणींना यामुळे अखेर ब्लॉग लिहावा लागला. मुरली मनोहर जोशी आज कुठे आहेत? ’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपमधील संवाद हरपला असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे नोटाबंदी हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा असल्याची टीकाही त्यांनी केली. राजद नेते लालूप्रसाद यादवांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल सिन्हांनी त्यांचे आभारही मानले आहेत.