Breaking News

दखल - अंध नमोभक्तभारतात यापूर्वी अनेक पंतप्रधान झाले; परंतु त्यांच्या नावानं कुठल्या सेना, संघटना नव्हत्या. इंदिरा गांधी यांच्या नावानं थेट पक्ष होता, हा भाग वेगळा; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे असताना आणि त्यांचा पक्ष केडर बेस असताना गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या ‘नमो’ नावानं वेगवेगळ्या संघटना कार्यरत आहेत. पक्षाला समांतर अशा संघटनांची खरं तर आवश्यकता नसते; परंतु अशा अंध भक्तांमुळं कधी कधी अडचण होऊ शकते.

डावे आणि उजवे असे दोन्हीही कर्मठ असतात. ते दुसर्‍यांचं कधीच ऐकून घेत नाहीत. आपले विचार पसरविण्यासाठी बर्‍याचदा खोट्या गोष्टींचा आधार घेतात. निषिद्ध असलेल्या बाबींचा ते बेमालूम वापर करीत असतात. जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नियम मोडतात, तिथं भक्तांनी मोडलं, तर काय बिघडलं, असं समर्थन कुणीही करू शकेल. पुलवामा आणि बालाकोटच्या घटनेनंतर हुतात्मा जवान आणि लष्कराचा निवडणुकीतील प्रचारासाठी वापर करू नये, असं निवडणूक आयोगानं स्पष्टपणे बजावलं होतं. त्यांनी त्यासाठी खास बैठक घेतली. तरीही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय लष्कराचा उल्लेख मोदी जींकी सेना असा केला. भारतीय लष्कर हे कुणा व्यक्तीचं नसतं. ते देशाचं असतं. त्याच्यावर असा पक्षीय शिक्का मारणं चुकीचं असतं. योगींच्या या विधानांबद्दल माजी लष्करप्रमुख आणि भाजपचे गाझियाबादचे उमेदवार व्ही. के. यांनीच तीव्र नाराजी व्यक्त करीत योगींना देशद्रोही ठरविलं! एकीकडं हे होत असताना मोदी यांनी मात्र युवकांना आवाहन करताना त्यांचं मत हुतात्मा जवानांना समर्पित करा, असं सांगितलं. नगर आणि औसा येथील मोदी यांच्या भाषणाचा अहवाल आता निवडणूक आयोगानं मागविला आहे. त्याअगोदर भारतीय जनता पक्षाच्या एका प्रचार गाण्याचं ध्वनिमुद्रण करताना हुतात्मा जवानांचा संदर्भ देण्यात आला होता. हुतात्मा जवानांची छायाचित्रं आणि त्यावर मोदी यांचं मोठं छायाचित्र असे होर्डीग्जही काही ठिकाणी लावण्यात आले होते. या सर्व प्रकाराविरोधात निवृत्त लष्करी अधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त करीत, त्याबाबतचं पत्र राष्ट्रपतींना पाठविलं होतं. भारतीय लष्कराचं राजकीयीकरण थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. सर्वोच्च न्यायालय आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत अतिशय कठोर झालं असताना त्याचं पालन करण्यावर सर्वांनीच भर द्यायला हवा; परंतु इथं तर पदोपदी नियमाचं उल्लंघन चालू आहे. त्यात अशा काही उजव्या संघटना आहेत, की ते खोटया प्रतिमांचा आधार घेतात. तंत्रज्ञानाच्या काळात अशा खोट्या प्रतिमा सिद्ध करणं फारसं अवघड नाही. त्यामुळं खोटेपणा तर उघड होतोच; परंतु त्याचबरोबर पक्षही अडचणीत येऊ शकतो.

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी गुजरातमधील कुपोषण दाखविताना काँग्रेसनं जाहीरातीत जो फोटो वापरला होता, तो युक्रेनचा होता. मोदी यांच्या भक्तांनी आता त्यावर कहर केला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं बालाकोट इथं घुसून जैश-ए-मोहमंदचे तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्ताननं एफ-16 विमानं भारतात घुसवली. त्या विमानांचा पाठलाग करून त्यांना पाडताना भारताचं एक विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळलं. त्यात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा समावेश होता. युद्धकैद्यासंबंधीच्या नियमाप्रमाणं आणि त्या वेळी सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेमुळं अभिनंदन यांची पाकिस्तानला सुटका करावी लागली. लष्करातील अधिकारी उघडपणे कोणत्याही पक्षाच्या समर्थनाची भूमिका घेऊ शकत नाही, असा नियम असताना नमोभक्तांनी अभिनंदन वर्धमान यांनी भारतीय जनता पक्षाला उघड पाठिंबा दिल्याचा आणि त्यानं नरेंद्र मोदींना मत दिल्याचा दावा करणारा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोबरोबर करण्यात आलेल्या दाव्यामध्ये लिहिलं आहे, की अभिनंदन वर्धमान यांनी भाजपला उघड पाठिंबा दिला आहे आणि इतकंच नाही तर त्यांनी मोदी यांना मतही दिलं आहे. आताच्या काळात नरेंद्र मोदींशिवाय दुसरी कोणतीही व्यक्ती चांगली पंतप्रधान होऊ शकत नाही. मित्रांनो लष्कराच्या एखाद्या जवानास जिवंत परत कधीच आणले नाही, हे जिहादी आणि काँग्रेसच्या लक्षात आणून द्या, असं त्यांनी म्हटलं असलं, तरी यापूर्वी भारतानं पाकिस्तानच्या ताब्यातील अनेक युद्धकैद्यांची सुखरूप सुटका केली आहे, हे अंधभक्तांना माहीत नाही. 27 फेब्रुवारी रोजी अभिनंदन यांचं विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाडल्यानंतर त्यांना पकडण्यात आलं होतं. 1 मार्च रोजी त्यांना भारताकडं सोपवण्यात आलं होतं.
या काळामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. व्हायरल झालेल्या फोटोतून अभिनंदन यांच्या लोकप्रियतेचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येतं. नमो भक्त, मोदी सेना यासारख्या उजव्या विचारसरणीच्या फेसबूक ग्रुप्सवर तो फोटो शेअर करण्यात आला आहे. वास्तविक अफवा आणि खोटे फोटो शेअर करणं हा गुन्हा आहे. हे या भक्तांच्या गावी नसावं. फेसबुक आणि ट्वीटरवर हजारो लोकांनी तो पाहिला आहे. 

या फोटोची सत्यता पडताळण्यात आली, तेव्हा या भक्तांचा अंधपणा लक्षात आला. या फोटोची सत्यता पडताळणी करण्यात आली, तेव्हा हा फोटो अभिनंदन यांचा नसल्याचं स्पष्ट झालं. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तयार झालेल्या तणावपूर्वक स्थितीनंतर अभिनंदन यांचा देशभरात गौरव करण्यात आला होता. त्याच्या मिशांची स्टाइल भारतांमध्ये लोकप्रिय झाली होती. अनेकांनी तशा मिशा, केसांची रचना करून घेतली होती. त्यांच्यासारख्या दिसणार्‍या आणि तशाच मिशा असलेल्या व्यक्तीत अन्य अनेक बाबतीत फरक असल्याचं आढळलं आहे.

नमो भक्तांनी फोटोची खातरजमा न करता तो तसाच फॉरवर्ड केला. या फोटोत अभिनंदन यांच्यासारख्या मिशा असणार्‍या व्यक्तीनं काळा चष्मा घातला असून त्यानं गळ्यात भाजपचं चिन्ह कमळ असलेलं उपरणं घातलं आहे. लष्कराच्या सेवेत असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पक्षाचं उपरणं गळ्यात घालता येत नाही, तो त्याच्या सेवाअटींचा भंग होऊन त्याला नोकरी गमवावी लागू शकते. फोटोत अभिनंदन यांच्यासारख्या दिसमार्‍या व्यक्तीमध्ये आणि अभिनंदनमध्ये बराच फरक आहे. अभिनंदन यांच्या ओठांच्या खाली डाव्या बाजूला तीळ आहे; मात्र फोटोतल्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर तसं दिसत नाही. फोटोतल्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याजवळ तीळ आहे; मात्र खर्‍या अभिनंदनच्या उजव्या डोळ्याजवळ असा तीळ नाही.

फोटोतल्या व्यक्तीच्या मागे समोसा सेंटर अशी गुजराती अक्षरं असलेली पाटी आहे, त्यामुळे हा फोटो गुजरातमध्ये काढलेला दिसून येतो; परंतु गुजरातमध्ये अजून मतदान झालेलंच नाही. त्यामुळं अभिनंदन यांनी मोदी यांना मतदान करण्याचा प्रश्‍नच नाही. शिवाय मतदान गोपनीय असतं. ते कुणाला केलं, हे सांगण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. अभिनंदन यांनी 27 मार्च रोजी श्रीनगरमध्ये वायूदलामधील काम पुन्हा सुरू केलं आहे. कामावर रूजू होण्यापूर्वी त्यांना चार आठवड्यांची विश्रांती घ्यावी, असं डॉक्टरांनी सुचवलं होतं; मात्र त्यांनी काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. अभिनंदन यांनी पुन्हा विंग कमांडर म्हणून काम सुरू केलं. ‘वायूदल नियम 1969’ नुसार कोणत्याही अधिकार्‍याला कोणत्याही राजकीय संघटनेत किंवा चळवळीत सहभागी होता येत नाही किंवा मदत करता येत नाही. हा व्हायरल झालेला फोटो विंग कमांडर अभिनंदन यांचा नसल्याची माहिती भारतीय वायूदलांमधील सूत्रांनी दिली. फेक न्यूजमध्ये त्यांचा वापर याआधीही झाला आहे. त्यांची पाकिस्ताननं सुटका केल्यानंतर काही तासांमध्ये ‘सोशल मीडिया’वर त्यांच्या नावानं अनेक फेक अकाऊंटस सुरू करण्यात आली होती. एखाद्या देशभक्त अधिकार्‍याचं करिअर अशा पद्धतीच्या फेक मेसेडच्या आधारे आपण पणाला लावू शकतो, हे अंधभक्तांच्या लक्षात आणून द्यायला हवं. लष्करी अधिकार्‍याचा राजकारणासाठी बळी देणं योग्य नाही, हे समजायला हवं.