Breaking News

राजेंचे कट्टर समर्थकांवर होणार तडीपारीची कारवाई


सातारा / प्रतिनिधी : सातारा लोकसभा निवडणुकीत आता कुठे राजकीय वातावरण तापू लागले असताना सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सुरुची प्रकरणातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असणार्‍या अनेक कार्यकर्त्यांना 18 एप्रिल ते 24 एप्रिल या कालावधीत तडीपार करण्यात येणार असल्याच्या नोटीसा पोलीस प्रशासनाच्यावतीने देण्यास सुरुवात झाली आहे. सुरुची राडा प्रकरणातील राजेंच्या चार समर्थकांना या नोटीस बजावण्यात आल्या असून उर्वरित लोकांना येणार्‍या दोन दिवसांत या नोटीस बजावण्यात येणार आहेत. या नोटीसला उत्तर देण्यासाठी 16 एप्रिलपर्यंतची मुदत प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या प्रशासनाच्या कारवाईमागे राजकीय षडयंत्र असल्याची कुजबूज सातार्‍यात होत आहे.
या तडीपारीच्या कारवाईमुळे खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सुरुची प्रकरण होवून एक वर्ष होऊन गेले तरी कार्यकर्त्यांच्या अडचणी कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.

आता तर दोन्ही राजेंचे मनोमीलन झाले असल्याने सातारा शहरात आता राजकीय शांतता निर्माण झाली असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.