Breaking News

खटाव तालुका कॉंग्रेस आघाडी धर्माचे पालन करणार


वडूज/प्रतिनिधी : खटाव तालुक्यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आघाडी धर्माचे पालन करणार असल्याचे आज येथे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव गोडसे, तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माणचे तालुकाध्यक्ष एम.के. भोसले, उपनगराध्यक्ष विपूल गोडसे, दिलीपराव शिंदे, माजी सरपंच अर्जुन गोडसे, दिलीप घार्गे, दिपक गोडसे, ऍड. संतोष भोसले, रणजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना श्री. गोडसे म्हणाले, खटाव तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते गेली 40 ते 50 वर्षे कॉंग्रेस बरोबर कायम आहेत. लोकसभा निवडणूकीतील माढा लोकसभा मतदार संघातील भूमिकेसंदर्भात आम्ही तालुक्यातील कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना भेटलो त्यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत.

त्यानुसार आम्ही तालुक्यातील सर्व कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आघाडी धर्माचे एकनिष्ठपणे पालन करून आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांना चांगल्या मताधिक्क्‌यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. डॉ.देशमुख म्हणाले, राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी तळागाळातील ते राष्ट्रीय मुद्द्यांपर्यंत भूमिका स्पष्ट केली आहे. 

लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभीमानी शेतकरी संघटना, पिपल्स रिपब्लीकन पार्टी (कवाडे गट), शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची महाआघाडी झाली आहे. माढा लोकसभा मतदार संघातील खटाव तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळण्याची भूमिका घेतली आहे.
श्री. भोसले यांनी खटाव तालुक्यातील कॉंग्रेसने आघाडी धर्म पाळण्याच्या घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले.
दोन्ही तालुक्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते एकदिलाने आघाडी धर्माचे पालन करून आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील अशी ग्वाही दिली.

यावेळी ऍड. भोसले आदींनी मनोगत व्यक्त केले. माजी सरपंच श्री. गोडसे यांनी प्रास्ताविक केले अनिल कचरे यांनी आभार मानले. यावेळी संभाजी गोडसे, महेंद्र गोडसे, विक्रम गोडसे, सचिन घाडगे, पृथ्वीराज देशमुख, विजय गोडसे, कल्याण देशमुख, फयाज मुलाणी, पंकज मेहता आदी उपस्थित होते.