Breaking News

जयंतीनिमित्त महामानवाला जिल्ह्यात अभिवादन


सातारा/ प्रतिनिधी : दलितोध्दारक, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांनी लाखो अनुयायांनी अभिवादन केले. शहरातील यशवंत उद्यानातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. सायंकाळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. जयंतीनिमित्त पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाई, कोरेगाव, कराड, पाटण, मेढा, म्हसवड, माण, खटाव, फलटण परिसरातही विविध कार्यक्रमांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिनवादन करण्यात आले.
शनिवारी रात्री 12 पासूनच शहरातील यशवंत उद्यानातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. दरम्यान, बागेतील व्यासपीठावर विविध संघटनांच्यावतीने आयोजित धम्मगीतांच्या कार्यक्रमालाही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळी पावणेनऊ वाजता जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रमांना भंत्तेजींच्या उपस्थित प्रारंभ झाला. सकाळी 10.30 वाजता खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सातारा विकास आघाडीचे नगरसेवक, नगरसेविका, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. ऐवळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भारिपचे चंद्रकांत खंडाईत, रिपब्लिकन ब्लू फोर्सचे दादासाहेब ओव्हाळ, ज्येष्ठ करसल्लागार अरुण गोडबोले, बाळासाहेब शिरसाट, अमर गायकवाड, रावण गायकवाड, वैभव गायकवाड, प्रकाश भिसे, सचिन पवार यांच्यासह हजारो स्त्रीपुरुषांनी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी जयभीमच्या गजराने सर्व परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी एका संघटनेच्यावतीने भला मोठा केक कापण्यात आला. त्याचे वाटपही करण्यात आले. पुतळा परिसरात अण्णाभाऊ साठे मिशनच्यावतीने मसाले भात व लापशी, धम्मशील चॅरिटेबलच्यावतीने शिरा, पीआरपीच्यावतीने थंड पाणी, शहिद भगतसिंह प्रतिष्ठानच्यावतीने सरबताचे वाटप करण्यात आले. याचा लाभ अभिवादनासाठी आलेल्या आबालवृद्धांनी घेतला.

दरम्यान, याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता. सायंकाळी पुतळा परिसरातून काढलेल्या भव्य मिरवणूकीत चित्ररथ सहभागी झाले होते. ही मिरवणूक कमानी हौदमार्गे, देवीचौक, मोतीचौक, राजवाडामार्गे खालच्या रस्त्याने पुन्हा पुतळा परिसरापर्यंत काढण्यात आली.