Breaking News

नेवासे येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा


नेवासे/प्रतिनिधी : नेवासे येथील जुन्या पेठेत असलेल्या श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पुष्पवृष्टी करत सियावर रामचंद्र की, जय असा जयघोष करत झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याने सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले. यावेळी रामनामाच्या गजराने नेवासेनगरी दुमदुमली होती.

नेवासे येथील जुन्या पेठेजवळ पुरातन महिमा असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीराम नवमीनिमित्त दासबोध पारायण झाले. महिला मंडळाचे श्रीरामरक्षास्रोत्र पठण, बीड येथील अक्षय गंगा प्रासादिक महिला मंडळाच्यावतीने हरिपाठ, सायंकाळी स्थानिक गायक व कलाकारांच्यावतीने संत वाणी, शास्त्रीय संगीत तबला जुगलबंदी, स्वाध्याय प्रवचन, भजनसंध्या, रामगावा, अभंगवाणी, एकतारी भजनाच्या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीराम नवमी उत्सव समिती व देवस्थान स्ट्रस्टच्यावतीने श्रीराम नवमी निमित्त आयोजित कार्यक्रमाला योगदान देणार्‍यांचा सन्मान श्रीफळ प्रसाद देऊन करण्यात आला.