Breaking News

दाखल उत्तर प्रदेशातील वस्त्रहरणउत्तर प्रदेशातील आझमगड मतदारसंघ सध्या फारच चर्चेत आहे. एकेकाळच्या भावा-बहिणीत सध्या जो वाद सुरू आहे, तो अत्यंत खालच्या पातळीवर गेला आहे. आता सारवासारव सुरू झाली असली, तरी महिलांबाबत समाजवादी पक्षाची भूमिका कधीच फारशी पुढारलेली नव्हती, हे सांगण्याची आवश्यकता नाही. मुलायमसिंह यादव यांनाच आता परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी महाभारतातील उदाहरण देऊन भीष्म न होण्याचा सल्ला दिला आहे.

समाजवादी पक्षात वलयांकित अभिनेत्यांना स्थान द्यायला सुरुवात झाली, ती अमरसिंह यांच्यामुळं. अमरसिंह यांची बॉलिवूडमध्ये उठबस होती. त्यांनी नट, नट्यांना मुलायमसिंह यांच्या पक्षात आणलं. त्यांच्या ग्लॅमरसचा पक्षाला फायदा झाला. या नट्यांची निष्ठा समाजवादी पक्षावर नव्हती, तर ती अमरसिंह यांच्यावर होती, हे पुढं सिद्ध झालं. अखिलेश यादव यांच्या उदयानंतर त्यांनी अमरसिंह यांच्यासारख्यांना कढीपत्त्यासारखं काढून टाकलं. अमरसिंह यांनी मग भाजपशी जवळीक केली. त्यांच्याच प्रयत्नांमुळं जयाप्रदा भाजपत गेल्या. या जयाप्रदा यांना समाजवादी पक्षानं राष्ट्रीय सरचिटणीस, खासदारकी सर्व दिलं होतं; परंतु नंतर त्यांना पक्षातून बाहेर पडावं लागलं. मागच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. राष्ट्रीय लोकदलाच्या त्या उमेदवार होत्या. आता त्यांनी कमळ हाती घेतलं आहे. अभिनेत्री अभिनयात पटाईत असतात. त्यांना ड्रामा करण्याची दैनंदिन सवय असते. जयाप्रदा आणि समाजवादी पक्षाचे सरचिटणीस आझम खान हे पूर्वी परस्परांना भाऊ-बहीण मानत. खरंतर राजकीय संबंधापेक्षा नात्याचा ओलावा अधिक असतो, असं म्हणतात. आईवडील, भाऊ-बहीण वेगवेगळ्या पक्षात असले, तरी त्यांच्यातला भावनिक ओलावा कायम राहिल्याची अनेक उदाहरण भारतात आहेत. जयाप्रदा आणि आझमखान मात्र त्याला अपवाद आहेत. त्यांचं भावा-बहिणीचं प्रेमही तकलादू होतं, हे आता दिसतं आहे. भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर जयाप्रदा यांनी जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हाच त्यांनी केलेला भावनिक ड्राम चांगलाच गाजला होता. भर सभेत त्या रडल्या. आझमखान यांनी आपल्याला आयुष्यात उठवण्याचा प्रयत्न केला, असं त्या म्हणाल्या. आझमखान आणि जयाप्रदा यांच्यात राममपूरमध्ये चुरशीची लढत होत असून तिला दररोज वेगवेगळे कंगोरे आले आहेत. आझमखान आणि जयाप्रदा यांच्यात रोज वाद-विवाद घडत आहेत. आझमखान हे वादग्रस्त बोलण्याबाबत प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळं अनेकदा पक्षावरही तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. आताही त्यांनी जयाप्रदा यांच्याबाबत केलेल्या अश्‍लील टिप्पणीमुळं पक्षाची कोंडी झाली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मुलायमसिंह यादव यांनाच भीष्म न होण्याचं साकडं घातलं आहे. आपल्या विधानामुळं वाद होत असल्याचं लक्षात आल्यानंतर आझमखान यांनी आपण असं बोललोच नाही, अशी सारवासारव सुरू केली आहे. तसंच आपण असं बोललो असेल, तर राजकारणातून निवृत्ती घेऊ, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.

आझमखान हे रामपूर लोकसभा मतदारसंघातील एका सभेत बोलत असताना त्यांनी आपली पातळी सोडली. अखिलेश यादव यांच्यासह अन्य नेते तिथे असताना कुणीही आझमखान यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला नाही. लोकांनीही टाळ्या वाजविल्या. ज्यांना बोटाला धरून आपण राजकारणात आणले, रामपूरमध्ये घेऊन आलो, त्यांनी माझ्यावर काय काय आरोप केले. त्यांनी रामपूरवासीयांचे रक्त पिले. दहा वर्षे ज्यांनी आपले प्रतिनिधित्व केले, त्यांना समजायला तुम्हाला 17 वर्षे लागली, त्यांना मी 17 दिवसांतच ओळखले होते. त्यांची अंडरपँट खाकी रंगाचीच होती, असे ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्यात कुठंही जयाप्रदा यांचं नाव नव्हतं; परंतु रोख त्यांच्याकडंच होता, हे वेगळं सांगायला नको. त्यावरून वाद निर्माण झाला. भाजपचे प्रवक्ते चंद्रमोहन यांनी आझमखान यांच्यावर त्यावरून टीका केली. अश्‍लील आणि महिलांविषयी अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आझमखान यांच्यासारखे नेते बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांना कसे सहन होतात, असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रीय महिला आयोगानं आझमखान यांना नोटीस बजावली. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मात्र आझमखान यांनी सावरून घेतलं. आपल्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, हे राजकीय नेत्यांचं लाडकं स्पष्टीकरण इथंही पुढं आलं. ‘मी दिल्लीमधल्या आजारी असलेल्या एका व्यक्तीबद्दल बोलत होतो. तो म्हणाला होता माझ्याकडे 150 रायफल असून आझमखान समोर दिसले, तर त्यांना गोळी घालीन. मी त्याच्याबद्दल बोलत होतो. लोकांना त्याच्याबद्दल समजायला वेळ लागला. नंतर त्याने आरएसएसची पँट घातली असल्याचं समजलं. मी त्याच्याबद्दल बोलत होतो, अशी सारवासारव आझम खान यांनी केली आहे.जयाप्रदांबद्दल मी असं बोललोच नाही,’ अशी कोलांटउडी त्यांनी घेतली. बोटाला धरून आणलं, दहा वर्षे लोकप्रतिनिधित्त्व केलं, हे दिल्लीतील एका व्यक्तीला कसं लागू होतो, याचं उत्तर आझमखान यांच्याकडं नाही. चौफेर टीका सुरू झाल्यानंतर आझमखान यांनी आता आपण जयाप्रदा यांच्याबद्दल कोणतंही आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं नाही असा दावा केला आहे. मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. मी दोषी ठरलो तर निवडणुकीतून माघार घेईन, असं आझमखान यांनी म्हटलं आहे.
जयाप्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मी रामपूरमधून नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आलो. मी मंत्री होतो. त्यामुळे काय बोलायचं हे मला समजतं. मी कोणाचं नाव घेतलं, कोणाचा अपमान केला, असे सवाल त्यांनी केले. प्रसारमाध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असं ते म्हणाले. याआधी सुद्धा दोघांमध्ये बरेच वाद झाले आहेत.
मी मेल्यानंतर तुम्हाला समाधान मिळणार का, असा सवाल जयाप्रदां यांनी केला आहे. आझमखान जे बोलले, ते मी पुन्हा बोलू शकत नाही. मी त्यांचं काय केलं आहे ते मला समजत नाही, असं त्या म्हणाल्या. आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. तुम्हाला आठवत असेल तर 2009 साली मी समाजवादी पक्षाची उमेदवार होते. त्या वेळीसुद्धा त्यांनी माझ्या विरोधात वक्तव्य केल्यानंतर कोणी मला पाठिंबा दिला नव्हता, असं त्यांनी निदर्शनास आणलं आहे. आझम खान यांना निवडणूक लढवण्याची परवानगी देऊ नये. कारण हा माणूस निवडणूक जिंकला तर लोकशाहीचे काय होईल? समाजामध्ये महिलांना स्थान उरणार नाही. आम्ही कोठं जायचं? तुम्हाला काय वाटते मी घाबरून रामपूर सोडून निघून जाईन ? मी रामपूर सोडणार नाही असं जयाप्रदा यांनी ठणकावून सांगितलं.

जयाप्रदा यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरणार्‍या आझमखान यांचा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी समाचार घेतला आहे. स्वराज यांनी ट्विट करुन मुलायमसिंह यादव यांना भीष्माप्रमाणे मौन रहाण्याची चूक करू नका असं साकडं घातलं आहे. मुलायम भाई तुम्ही समाजवादी पक्षाचे पितामह आहात. तुमच्यासमोर रामपूरमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण होत आहे. तुम्ही भीष्माप्रमाणे मौन रहाण्याची चूक करू नका असं सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. सुषमा स्वराज यांनी आपल्या ट्विटमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, त्यांच्या पत्नी डिंपल यादव आणि जया बच्चन या महिला नेत्यांनाही टॅग केलं आहे. आता मुलायमसिंह त्यावर काय भूमिका घेतात, हे पाहायचं.