Breaking News

राजकारणाच्या झुळक्याने मराठा समाजात पुन्हा बेकी मोर्चाची शिलाई उधडणार्या शिलेदारांना समाज माफ करील?


नाशिक/प्रतिनिधी

हवा होता एक मोर्चा,जो साडे चारशे वर्षात मनामनावर आलेली जळमट साफ करील...
हवा होता एक मोर्चा जो बांधावरच्या भावकीचे खोड ऐक्याच्या मायेने जाळून टाकील...
हवा होता एक मोर्चा, जो राजकारणाची झुल उतरवून समाजाला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल..
हवा होता एक मोर्चा,जो मिथ्या प्रतिष्ठेचे कवच कुंडले फेकून देईल...
हवा होता एक मोर्चा, जो राजकारणाच्या दलदलीतून बाहेर आणून समाजकारणाला प्राधान्य देईल..
बांधला गेलाही होता हवा तसा हवा तो मोर्चा...
भल्याभल्यांची हवा गुल करीत बांधला होता ऐक्याचा शिवगड...
शिव श्रध्देला साक्षी ठेवून आणाभाकाही झाल्या पुन्हा नाही करणार गद्दारीच्या..
पण राजकारणाच्या एका झुळक्यासरशी कोसळला तो मोर्चा...
विरली ती हवा एक मराठा लाख मराठा निर्धाराची
कोण शिव अन् कुठली श्रध्दा आम्ही कुठले सरदार?
पून्हा घेऊ हाती झेंडे उचलू चपला पुढार्यांच्या..
राजे आम्ही तख्ताविना भले तरी मागू भिक पण सोडणार नाही आमचा दरिद्री बाणा...
यासारख्या अनेक काव्य पंक्तींच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चाची राजकारणाने केलेली छिन्नविछिन्न अवस्था विषद करता येऊ शकते.
खरेतर दोन वर्षापुर्वी या महाराष्ट्राने जे चिञ पाहीले अनुभवले ते वास्तव होते का? छञपतींच्या गाढ निद्रीत असलेल्या महाराष्ट्राला पडलेले ते एक शर्करा स्वप्न होते का? या प्रश्नांची उत्तरे आज मिळू लागली आहेत.
न भूतो अन् आता न भविष्यती असे मराठा समाजाचे ऐक्य या महाराष्ट्राने अनुभवले.या समाजाच रणांगणांवरील,राजकारणातील,समाजकारणातील आणि भाऊबंदकीतील मोठेपणा दर्शविणारा इतिहास इथे पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही.तो सर्वश्रूत आहेच.
हा सारा प्रपंच या ठिकाणी सांगण्याचे प्रयोजन आहे ते लोकसभेच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा मराठा समाजाने आपली राजकीय जात उघड केली आणि मीच मराठा समाजाचा ठेकेदार असा समज करून क्रांती मोर्चाने मोठी केलेली माणस समाजाला गृहीत धरून या निवडणूकीत समाजाला खेळणं म्हणून वापरू लागली आहेत.
मिञांनो! मराठा समाज हा स्वभावताच राजकीय पिंड घेऊन जन्माला आहे.पाण्याशिवाय मासा जीवंत राहू शकत नाही तसा हा समाज देखील राजकारणाशिवाय वावरू शकत नाही.अखेरचा गुंठा विकून त्याच गुंठ्याच्या बांधावर प्रसंगी मजूरी करील पण कट्यावर बसून सरपंचाच्या घरापासून ट्रम्प,पुतीनच्या चुका काढल्याशिवाय जेवणार नाही इतके राजकारणात आमच्या रक्तात भिनले आहे.पर्याय नाही.राजकारण करणे वावगेही नाही.जरूर करावे,प्रत्येकाला तो अधिकार आहे.पण त्या लाखोंच्या मोर्चात घेतलेल्या आणाभाका,ती भाषणं अजून विस्मरणातही गेले नाही तेच आम्ही प्रत्येकजण स्वतःशीच प्रतारणा करण्याचे धाडस करू लागलो.
आजपर्यंत आम्ही उदात्त विचार देणार्या आंबेडकरी चळवळीची छकले झाली म्हणून हसत होतो.भिमशक्ती खर्या अर्थाने एकवटली तर या देशाची सत्ता हस्तगत करू शकते,पण नेते तेव्हढे गट हा शाप या चळवळीला लागला असे अकलेचे ढोस पाजत होतो.आम्ही यापेक्षा वेगळे काय करीत आहोत?
जुन्या जाणत्यांची कमी नव्हती ,अजून त्यात नव्यांनी भर घातली.धेंडांनी राजकारण करून समाजाची वाट लावली,असे शिव्याशाप आपल्याच वाडवडीलांना देण्याचे पाप करणारे आपण आज त्यांच्यापेक्षा वेगळे काय करीत आहोत?
ज्या ताईने तुम्हाला खर्या अर्थाने एकञ येण्यास भाग पाडले त्या कोपर्डीच्या ताईला तुम्ही न्याय मिळवून दिला का? ज्या बावीस पंचवीस मागण्यांसाठी तुम्ही लाखोंची जनसंख्या वेठीस धरली त्या पदरात पडल्यात का? यापैकी काहीच मिळालं नसतांना शहाजोगपणे राजकारण नाकारणारे आम्ही पुन्हा राजकारणाचे झेंडे का उडवू लागलो?
मिञांनो! पुन्हा एकदा या ठिकाणी विनम्र निवेदन आहे की,राजकारण करायला विरोध नाही पण कुठले राजकारण आपण हाती घेतले आहे? स्वतंञ बाणा असतांना तितक्याच स्वतंञपणे राजकारण करणे शक्य नव्हते का? हा विचार एकाही मराठा संघटनेने करू नये? यापेक्षा दुर्दैव आणखी कुठले असू शकते?
नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या घडामोडी पाहील्यानंतर हे तेच चेहरे आहेत का ज्यांना क्रांती मोर्चाने खर्या अर्थाने चेहरा दिला.
कुणी कुणाला पाठींबा दिला या वादात जायचे नाही.पण कोण कुणाचा हत्यार म्हणून वापर करतोय याचा विचार समाज म्हणून प्रत्येकाला करावा लागेल.कुठल्या विचारसरणीला आपण पोसतोय? अगदी काल परवापर्यंत समाज हिताला कोण दंश करीत होते? आणि उद्या लोकसभेचा वग संपल्यानंतर चेहर्यावरचा उतरलेला राजकीय प्रसाधनांचा थर निघून काळा चेहरा घेऊन समाजात कसे जाणार आहात? क्रांती मोर्चाच्या व्यासपीठावर तुम्हाला आम्हाला समाज स्वीकारेल का? याचा विचार करावाच लागेल अन्यथा राजकीय वयात येण्याआधीच राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या बाद घोषीत होण्याची वेळ येईल
आपण हसत होतो,त्या आंबेडकरी चळवळीची छकले ज्या राजकीय प्रवृत्तींनी केली त्याच राजकीय विचारांचा वारसा सांगणार्या भुजातील बळ मराठा क्रांती मोर्चाची छकले करण्याचे कारस्थान करू लागले आहेत.एकवटलेला मराठा समाज एकसंघ राहीला तर केवळ मराठाच नव्हेतर अन्य बहुजन बांधवांमध्येही शिरायला वाव राहणार नाही ही समाज ऐक्याची ताकद ओळखून फोडा झोडा आणि छाताडावर नाचा ही निती राबविली जात आहे.त्यासाठी लोकसभेचा मुहुर्त साधला जात आहे.
सर्व मराठा संघटनांना एकञ येऊन बहुजनांच्या अन्य संघटनांना सोबत घेत सक्षम राजकीय पर्याय देणे शक्य होते.माञ संघटनांमधील हेवेदावे बाजूला ठेवणे शक्य झाले नाही.ज्यांनी स्वबळावर पर्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यांना एकटे पाडण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न झाला .काही ठिकाणी अजूनही सुरू आहे.हेच कच्चे दुवे हेरून राजकारणातील बाहुबलींनी काही अल्पमती,अल्पसंतुष्ट,असमाधानी चेहर्यांना भुल दिली त्यांच्यावर मोहीनी घातली आणि मुळ प्रवाहातून बाजूला काढीत मराठा समाजात फूट पाडण्याचे पाप केले.अर्थात या फुटीर शक्तींचे सामर्थ्य ते किती? याची जाणीव समाजाला आहे तेव्हढीच बाह्या वर करून भुजांचे बळ दाखविणार्यांनाही आहे.तरीही एकीचे बळ नेकीला पुरक ठरते हे ध्यानात घेऊन रस्ता चुकत असलेल्या मंडळींनी वेळीच मुळ प्रवाहात सहभागी होणे काळाची गरज आहे,आज त्यांना गरज आहे म्हणून तुमच्यासमोर शरणागती होईल.डिमांड पुर्णही होईल माञ भविष्यात खरा धोका कुणाकडून आहे याचा भुतकाळावरून अंदाज बांधा आणि खरा शञू ओळखा.घरातले भांडण घराता बसून केंव्हाही मिटविणे शक्य होईल,मुळ शञूला गारद करणे हे प्रथम आणि अंतिम ध्येय असू द्या.अन्यथा श्रध्दा ताईचा शाप लागून ना घर का ना घाट का अशी अवस्था झालेल्या आपल्या प्रत्येकाला समाज झिडकारेल.येणार्या कित्येक पिढ्याही माफ करणार नाहीत.असा आक्रोशवजा सुर समाजातून ऐकायला मिळत आहे.केवळ नाशिकमध्येच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात हिच धारणा आहे.