Breaking News

गोंदवले बु. येथे रामनवमी भक्तीभावात


म्हसवड/ प्रतिनिधी : श्री ब्रम्हचैतन्य महाराजांनी गोंदवले बुद्रुक येथे स्थापन केलेल्या श्रीराम मंदिरात आज रामनवमीनिमित्त भक्तीचा महापूर आला होता.हजारो भाविकांनी श्रीरामबरोबरच श्री गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

येथील थोरले व धाकटे श्रीराम मंदिराची स्थापना स्वतः महाराजांनी केली आहे.त्यामुळे या दोन्ही श्रीराम मंदिराला विशेष महत्व आहे.दरवर्षीप्रमाणे या मंदिरात गुढीपाडव्याला रामनवमी उत्सवाला सुरुवात झाली.यानिमित्ताने थोरले श्रीराम मंदिरात पहाटे काकड आरती,पंचपदी भजन,रुद्राभिषेक,पवमान,करुणाष्टके,सवाया, रामपाठ, विष्णुसहस्रनाम हे कार्यक्रम दररोज सुरू होते.याशिवाय अखंड जप व भजन(पहारा) तसेच रोज संध्याकाळी ह.भ.प.सदानंद गोखले यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

आज श्रीरामनवमी दिवशी दुपारी ह.भ.प.सदानंद गोखले यांचे राम जन्माचे कीर्तन झाले.दुपारी साडेबारा वाजता श्रीरामाच्या जयघोषात गुलालाचा मुख्य कार्यक्रम झाला.त्यानंतर न्हाणी,पाळणा व आरती होऊन सुंठवड्याचा प्रसाद वाटण्यात आला.धाकटे श्रीराम मंदिरातही ह.भ.प.सुखदेव इंगवले यांचे राम जन्माचे कीर्तन झाले.या कार्यक्रमासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.उद्या पारण्याचा कार्यक्रम होणार असून दुपारी पारंपरिक कुस्त्यांचा भव्य आखाडा भरणार आहे. रात्री भंडार्‍याच्या कार्यक्रम झाल्यानंतर पालखी मिरवणुकीने रामनवमी उत्सवाची सांगता होईल.