Breaking News

अग्रलेख - नवी राजशैली


निवडणुकीच्या काळात कोणी कोणावरही काहीही आरोप करतो. त्याला आरोपाला शेंडा नसतो आणि बूडही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तर सर्वांच्या दृष्टीने सॉफ्ट टार्गेट. कुणीही उठावे आणि काहीही आरोप करावेत, असे वर्षानुवर्षे चालत आले. पूर्वी पवारही त्यांच्यावरच्या आरोपांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडायचे नाहीत. त्याचा फटका त्यांना निवडणुकीत बसायला लागला. त्यामुळे ते आता उत्तर देतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही संशय निर्माण करण्यात वाकबगार आहेत. वास्तविक एवढ्या सर्व सत्ता असताना खरेच एखादा दोषी असेल, तर त्याला पाठिशी घालायचे काहीच कारण नाही. मग तो नेता कितीही मोठा असो. शिवसेना, भाजप असे आरोप करण्यात पटाईत आहेत; परंतु मोदी यांच्या सरकारमधील राफेल विमान खरेदी आणि किरिण रिजूजू यांच्या राज्यातील ऊर्जा प्रकल्पाच्या कंत्राटात गैरव्यवहारांचे आरोप झाले, तरी त्याची चौकशी करावी असे वाटले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्र्यांवर तर थेट उच्च न्यायालयानेच ताशेरे ओढले, तरीही त्यांना कायम ‘क्लीन चिट’ देण्यात आली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे वारंवार आरोपाच्या फैरी झाडून आपले आरोप खोटे असतील, तर फासावर लटकवा, असे आव्हान वारंवार देत आहेत. त्यांचे आव्हान स्वीकारण्याचे धाडस सरकार दाखवायला तयार नाही. शिवसेना-भाजपने आतापर्यंत राज ठाकरे यांच्यावरही असेच तडजोडीचे अनेक आरोप केले. आरोप करणारे सरकारमधील आहेत. त्यांनी राज यांच्यांशी का तडजोड केली? याचा अर्थ काहीतरी चुकीचे होते, म्हणून तर तडजोडी कराव्या लागल्या ना? राज यांची संहिता बारामतीचे पटकथाकार लिहितात, असे आरोप मुख्यमंत्र्यांसह अन्य करतात. संहिता कुणी लिहिली, यापेक्षा या संहितेला श्रोतृवर्गाच्या टाळ्या मिळतात, की नाही, हे महत्त्वाचे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी याच्या सभांना गर्दी होते; परंतु ती मतांत रुपांतरित होत नाही, असे म्हटले जायचे. तो अनुभव आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी यांना यायला लागला आहे.


राज ठाकरे हे सुरुवातीला मोदी यांचे प्रशंसक होते. आता ते कठोर टीकाकार झाले आहेत. त्यांचा हा प्रवास असा का झाला आणि त्याला कोण जबाबदार, याचे उत्तर शिवसेना-भाजपनेच शोधले पाहिजे. मोदी यांनी दिलेल्या आश्‍वासनांना, त्यांच्या कामांना राजही भुलले होते. त्यांनी गुजरातमध्ये जाऊन मोदी यांची भेटही घेतली होती. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत राज यांचा मोदी यांच्याबाबत भ्रमनिरास झाला. ‘अच्छे दिन’आले नाहीत, हा अनुभव सर्वांनाच आला. एकीकडे ही स्थिती असताना गेल्या पाच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादी हा शत्रू नसून शिवसेना-भाजपच आपला शत्रू आहे, हे राज यांच्या वारंवार लक्षात आले. मनसेचे आमदार शिवसेना, भाजपने पळविले. त्यांच्याकडे एकही आमदार उरला नाही. ज्या ज्या महापालिकेत सत्ता किंवा नगरसेवकांची संख्या चांगली होती, तिथेही शिवसेना-भाजपने सत्ता मिळविली. मनसेच्या नगरसेवकांना पराभूत करण्यातही शिवसेना-भाजपच आघाडीवर राहिला. दुसरे म्हणजे शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचे बहुमतासाठी घाऊक पक्षांतर करण्याचे काम शिवसेनेने केले. काँग्रेस-राष्ट्रवादीने हे केले नाही. मनसेच्या अस्तित्त्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. जे आपल्या गळ्याला नख लावायला निघाले आहेत, त्यांचा बंदोबस्त करायचा असेल, तर मग शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने मनसे दोन्ही काँग्रेसला साथ देत असेल, तर त्यात काही चूक आहे, असे मानण्याचे कारण नाही. मोठ्या लोकांना टार्गेट केले, तरच आपली दखल घेतली जाईल. फांद्या तोडण्याऐवजी मुळालाच घाव घालावा लागतो. राज सध्या जे करीत आहेत, ते याच व्यूहनीतीचा भाग आहे. राज यांना लोकसभेच्या निवडणुकीत बरोबर घ्यायची राष्ट्रवादीची तयारी होती; परंतु त्यांना बरोबर घेतले, तर अमराठी भाषकांची मते दूर जातील, या भीतीने काँग्रेस तयार नव्हती. त्यामुळे राज यांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असला, तरी मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचे सरकार येता कामा नये, अशी त्यांची भूमिका आहे. याच भूमिकेतून त्यांनी दोन्ही काँग्रेसला साथ द्यायची ठरविली आहे.


गुढीपाडव्यानिमित्त मनसेचा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. त्याच मेळाव्यात त्यांनी मोदीमुक्त भारत ही घोषणा दिली. काँग्रेसमुक्त भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे जसे मोदी यांना शक्य झाले नाही, तसेच मोदीमुक्त भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे अवघड आहे. राज यांना त्याची जाणीव नसेल, असे नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज ठाकरेला वापरून घेत आहेत असे भाजपवाले सांगत फिरत आहेत. मी एवढा वेडा नाही हे लक्षात असू द्या असे राज यांनी त्यांना सुनावले. मोदी-शाह यांच्या विरोधात राज सभा घेणार, याचा अप्रत्यक्ष फायदा दोन्ही काँग्रेसला होणार, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. ताकाला जाऊन भांडे लपविणार्‍यातले राज नसल्याने त्यांनी ते स्पष्टच सांगून टाकले. गोमांस बाळगण्याच्या आरोपावरून देशात शंभरपेक्षा जास्त जणांना जमावाने केलेल्या हिंसाचारात ठार केले. उत्तर प्रदेशात दादरी येथे गोमांस असल्याच्या संशयावरून मोहमंद अखलाक यांना ठार करण्यात आले. त्यानंतर समजले, की ते गोमांस नव्हते, तर मटण होते. मग, त्या अखलाकच्या मृत्यूला जबाबदार कोण, असा प्रश्‍न राज यांनी सगळेजण गायी कापत असते, तर दूध कोणी दिले असते, असा खोचक प्रश्‍नही राज यांनी विचारला. राजस्थानात 70 हजार गायी अन्न न मिळाल्याने मेल्या. छत्तीसगढ 200 गायी मेल्या ही उदाहरणे राज यांनी दिली. एनडीएच्या कार्यकाळात मांस निर्यात होते. या व्यवसायाशी एक समाज जोडला गेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? असा प्रश्‍न मोदींना विचारण्यात आला. त्यावर एक विशिष्ट समाज या व्यवसायाशी जोडला गेलेला नाही. माझे काही जैन मित्र आहेत तेदेखील या व्यवसायात आहेत असे मोदी यांनी म्हटल्याचे राज यांनी मोदी यांची व्हिडिओफीत दाखवून निदर्शनास आणले. गोमांसावरून हिंसाचाराच्या घटना घडल्या तेव्हा तुम्ही या सगळ्याबद्दल काहीही भाष्य का केले नाही, असा सवाल त्यांनी मोद यांना केला. नोटाबंदीनंतर देशात चार कोटी लोकांच्या नोकर्‍या गेल्या. 99.3%पैसे बँकेत परत आले. म्हणजे नोटाबंदी ही अपयशी ठरली. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मोदींनी स्वतःच्या आईला रांगेत उभे केले. मोदी यांना एकहाती सत्ता मिळाल्यावर त्यांना कितीतरी गोष्टी करता आल्या असत्या; मात्र त्यांनी काहीही केले नाही, अशी टीका राज यांनी केली. मोदी यांच्यावर अनेक बाबतीत टीका करताना त्यांनी दहा सभा महाराष्ट्रात घेण्याचे जाहीर केले. त्याचा फायदा दोन्ही काँग्रेसला किती होतो, हे 23 मे रोजी कळू शकेल.