Breaking News

‘अब होगा न्याय’; लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची टॅगलाईन


‘अब होगा न्याय’ साठी इमेज परिणाम

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँगे्रसने न्याय योजनेला केंद्रस्थानी ठेवत ‘अब होगा न्याय’ ची घोषणा काँगे्रकडून करण्यात आली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाची अब की बार मोदी सरकार ही घोषणा चांगलीच गाजली होती. यानंतर आता काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘अब होगा न्याय’ ची टॅगलाईन केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला फक्त चार दिवस शिल्लक आहेत. त्याआधी काँग्रेसने ‘अब होगा न्याय’ घोषणा दिली आहे. किमान उत्पन्न योजनाच काँग्रेसच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल, हे या घोषणेतून काँग्रेसने अधोरेखित केले आहे. राहुल गांधींनी न्याय योजनेची घोषणा केली होती. यानंतर गेल्याच आठवड्यात राहुल गांधींनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यातही न्याय योजनेवरच भर देण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना न्याय देण्यात येईल, असे राहुल गांधींनी म्हटले होते. न्याय योजनेच्या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 72 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन राहुल गांधींनी दिले आहे. देशातील 20 टक्के लोकांना या योजनेचा लाभ मिळेल, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ श्रीमंत उद्योगपतींना मदत करतात. मात्र आम्ही गरिबांना मदत करणार आहोत. काँग्रेसचे सरकार आल्यावर गरिबांना न्याय मिळेल, असे राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हटले होते. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला होता. ’जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन आम्ही ही योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,’ अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली होती.