Breaking News

तक्षीला स्कुलच्या विद्यार्थ्यांनी केली पथनाट्याद्वारे जनजागृती


अहमदनगर (प्रतिनिधी)- तक्षीला स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन शहरात पथनाट्याच्या माध्यमातून पाणी बचतसाठी प्रबोधन केले. तर मुलगी वाचवा... मुलगी शिकवाचा संदेश दिला. निमित्त होते शाळेच्या दशकपुर्ती सोहळ्याचे. शहरातील माळीवाडा, जुने बस स्थानक, आनंदधाम आदि परिसरात या जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. त्याला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शहरासह जिल्ह्यात काही वर्षापासून पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. सतत दुष्काळी परिस्थिती उद्भवत असल्याने पाण्याच्या संकटाने गंभीर रुप धारण केले आहे. भविष्यातील जलसंकटापासून वाचण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाणी वाचविण्याचा संदेश दिला. शहरात अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसत आहे. हा प्रश्‍न लक्षात घेऊन शाळेच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांनी दशकपुर्ती सोहळा जनजागृतीने साजरा करण्याचे ठरविले. तसेच महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून देखील स्त्री भ्रुण हत्याचे प्रकार उघडकीस येत आहे. महिलांना समाजात व कुटुंबात देखील दुय्यम दर्जा दिला जातो. 

तर मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रकार चालू आहे. हे समाजातील प्रश्‍न प्रबोधनाने सोडविता येणार असल्याची भावना प्राचार्या मेहेत्रे यांनी व्यक्त केली. 

शाळेत नवीन प्रवेश घेणार्‍या मुलींना मोफत शालेय पुस्तक संच, 10 वी व 12 वी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनीस अडीच हजार रु. तर विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयात प्रथम येणार्‍या विद्यार्थिनीस दोन हजार शंभर रुपये रोख बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येणार असाल्याचे शाळेच्या वतीने माहिती देण्यात आली. शाळेच्या प्राचार्या मेहेत्रे यांच्या संकल्पनेनुसार घेण्यात आलेल्या उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.