Breaking News

सुमित्र महाजनांचा लोकसभेच्या मैदानातून काढता पायभोपाळ : लोकसभा निवडणूकांचा बिगुल वाजल्यानंतर भाजपकडून सुमित्रा महाजन या इंदूर मतदारसंघातून उमेदवारीच्या प्रतीक्षेत होत्या. मात्र अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे महाजन यांनी लोकसभेच्या मैदानातूनच काढता पाय घेतला. आजच्या तारखेपर्यंत अद्यापही पक्षाने उमेदवार दिलेला नाही. यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केला आहे.

इंदोर मतदारसंघातून 2014 मध्ये सुमित्रा महाजन यांनी निवडणूक जिंकली होती. पक्षामध्ये ‘ताई’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सुमित्रा महाजन यांचा संयम तुटलेला दिसतो. त्यामुळेच त्यांनी शेवटी निर्णय घेऊन निवडणूक न लढवण्याचा निश्‍चय केलेला दिसतो. त्यांना तिकीट न मिळाल्याचे दुःख मात्र त्यांच्या पत्रातून साफ छळकत आहे. या जागेवरुन उमेदवार देण्यासाठी पक्ष गोंधळात दिसत आहे. पक्षाला या मतदार संघातून उमेदवार देण्यासाठी संकोच होत असावा, असे वाटते. या जागेवरुन उमेदवारी देण्याची जबाबदारी आपण पक्षावर सोपवली होती. मात्र, पक्ष आताही गोंधळातच दिसतो. त्यामुळे मी यंदा निवडणूकच लढवणार नाही. आता पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवार निवडावा, असे महाजन यांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेशमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. सुमित्रा महाजन यांनी या मतदार संघातून तब्बल 8 वेळा निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे ही जागा भाजपच्या पारड्यात आहे, असे म्हटले जाते. यावेळीही सुमित्रा महाजन यांना भाजप उमेदवारी देणार अशी चर्चा होती. त्यासाठी त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली होती. मात्र, त्यांच्या पत्रामुळे आता त्या निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. इंदूरच्या जनतेने मला आत्तापर्यंत प्रेम दिले. ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केले. त्या सर्वांची आपण आभारी आहे. पक्ष लवकरच आपला निर्णय घेऊन उमेदवार देणार अशी अपेक्षा आहे, असेही महाजन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या जागेवरुन मात्र पक्ष आता कोणाला उमेदवारी देणार हे पाहण्यासारखे झाले आहे. इंदूरमध्ये 19 एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे पक्षाला आता लवकर निर्णय घ्यावे लागणार.

महाजन यांनी कोंडी फोडली
लोकसभेच्या अध्यक्ष असलेल्या सुमित्रा महाजन या इंदूर येथून सलग आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या होत्या. तसेच 80 वर्षीय सुमित्रा महाजन यांची इंदूरमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता असल्याने त्यांना उमेदवारी नाकारणे पक्षश्रेष्ठींना शक्य होत नव्हते. अखेरीस सुमित्रा महाजन यांनीच निवडणूक न लढवण्याची घोषणा करून ही कोंडी फोडली. सुमित्रा महाजन यांनी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले होते. तसेच 2014 मध्ये भाजपाची सत्ता आल्यावर लोकसभा अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. सुमित्रा महाजन या लोकसभेच्या दुसर्‍या महिला अध्यक्ष ठरल्या होत्या.