Breaking News

बालकांसोबत पालकांनी ही वाचन वाढवावे : प्रा.राजमाता ठेंग


बुलडाणा,(प्रतिनिधी):  बालकांचे वाचन कमी होत आहे,असे नव्हे तर पालकांचे ही वाचन अत्यंत कमी झाले आहे. मुलांचे वाचन वाढवताना पालकांचे ही वाचन वाढवता आले पाहिजे. यासाठीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनापासून दोन महिने उन्हाळी बाल वाचन अभियानाचा शुभारंभ प्रगती सार्वजनिक वाचनालयात करण्यात आला. हा उपक्रम खरोखर प्रत्येक गावांनी अंगीकारावा, असे आवाहन संडे सायन्स स्कूलच्या संचालिका प्रा. राजमाता ठेंग यांनी व्यक्त केले.

पुस्तक मैत्री बाल वाचनालयाच्या पुढाकाराने प्रगती सार्वजनिक वाचनालयात विशेष वाचन अभियानाचा उपक्रम सुरू करण्यात आला. या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून राजमाता ठेंग बोलत होत्या.कार्यक्रमाला सुप्रसिद्ध बालसाहित्यिक सुभाष किन्होळकर, डॉ. की. वा.वाघ., पुस्तक मैत्रीचे अध्यक्ष नरेंद्र लांजेवार आणि अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप हिवाळे प्रामुख्याने उपस्थित होते. उन्हाळी बाल वाचन अभियानाबद्दल माहिती देताना संयोजक नरेंद्र लांजेवार यांनी मुलांना वाचनाकडे वळवणे ही आज शिक्षण क्षेत्रातील सर्वात कठीण बाब असल्याचे सांगून बालक आणि पालकांनी वाचनाचा छंद जोपासला पाहिजे, यासाठी हे अभियान आयोजित केल्याचे सांगितले. या दोन महिन्यांत जेवढी पुस्तके वाचाल तेवढे बक्षीस बालवाचकांना मिळणार आहे. या उपक्रमात दर रविवारी काही मान्यवर तज्ञ बाल वाचकांसोबत संवाद साधणार आहेत.

कार्यक्रमाला शहिना पठाण, प्रा. वानखेडे, डॉ. विजय काकडे, अमरचंद कोठारी, डॉ.गोरे, जयकुमार कस्तुरे ,पुरुषोत्तम गणगे, मुकुंद पारवे, अनिल अंजनकर, प्रा ढवळे, अमोल सातपुते, दीपक चित्रे, दीपाली सुसर, रूपाली दांडगे, अजय दराखे, देविदास गोसावी, महेंद्र सौभागे, वैशाली तायडे, सोपान भुंबे, राजू हिवाळे, प्रतीक शेजोळ आदी उपस्थित होते.