Breaking News

शिंगणापूरच्या शंभू महादेव यात्रेस प्रारंभ


शिंगणापूर / प्रतिनिधी : लाखो भाविंकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील यात्रेय शनिवारी विधिवत पध्दतीने शंभू महादेवाची गूढी उभारुन प्रारंभ झाला.

चैत्र शुध्द प्रतिपदेपासून नवीन संवस्तर प्रारंभ होत असल्याने यादिवशी शंभू महादेवाची विधिवत पध्दतीने पूजा करुन सालकरी, सेवाधारी मंडळी व देवस्थान समिती मार्फत मंदिरात गुढी उभारण्यात आली. तसेच स्थानिक सुवासिनींच्या उपस्थितीत घाना भरुन शिव-पार्वती हळदी समारंभासाठी लागणारी हळद दळण्याचा पारंपारीक सोहळा पार पडला. तर परिसरातील स्थानिकांनी कावडीनी जलाभिषेक करुन शंभू महादेवाचे दर्शन घेतले.

शिंगणापूर यात्रेस 10 एप्रिल रोजी हळदी समारंभाने प्रारंभ होणार असून 13 एप्रिल रोजी चैत्र शुध्द अष्टमीच्या दिवशी धज बांधण्याचा सोहळा तसेच शिव-पार्वती विवाह सोहळा होणार आहे.दि. 15 एप्रिल रोजी एकादशीच्या दिवशी काळगावडे राजे दर्शनासाठी येणार आहेत. तर 16 एप्रिल रोजी व्दादशीच्या दिवशी मुंगीघाटातील कावडी सोळळ्याने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेसाठी हॉटेल, मेवामीठाई, नारळप्रसाद, स्टेशनरी दुकाने तसेच मनोरंजन साधने यात्रा परिसरात दाखल होत आहेत. भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे.