Breaking News

वन्यजीवांसाठी पक्षीप्रेमींकडून पाण्याची उपलब्धता


अहमदनगर/प्रतिनिधी: तालुक्यातील डोंगरगण येथे दुष्काळाच्या तीव्रतेत तहानेने व्याकुळ होणाऱ्या पशु-पक्ष्यांसाठी दर पंधरवड्याला तब्बल २५ हजार लिटर पाणी येथील पशु-पक्षीप्रेमींकडून उपलब्ध करवून दिले जात आहे. येथील नैसर्गिक पाणवठ्यात तब्बल २५ हजार लिटर टँकरचे पाणी नुकतेच सोडले गेले. स्वच्छ पाण्याचा हा वाहता प्रवाह पाहून त्यात डुंबण्यासाठी व पिण्यासाठी लगेच पक्ष्यांची गर्दीही तेथे झाल्याने पक्षीप्रेमींच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

दोन वर्षांपासून पुरेसा पाऊस नसल्याने नैसर्गिक पाणवठे कोरडेठाक झाले आहेत. वन्य पशुपक्षी व प्राण्यांना त्यांच्या रहिवासाच्या परिसरात पिण्याचे पाणी नसल्याने ते मानवी वस्त्यांकडे येत आहेत. त्यामुळे मानवी जीवनाला व पक्षी जीवनालाही येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन येथील निसर्ग मित्र मंडळाने समाजातील सजग नागरिकांचे याकडे लक्ष वेधले व गेल्या महिन्यापासून डोंगरगण येथील नैसर्गिक पाणवठ्यात दर पंधरा दिवसांनी २५ हजार लिटरचा टँकर सोडून वन्य पशुपक्ष्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न सुरू आहे.