Breaking News

चाफळ येथे रामजन्म सोहळा भक्तीभावात


पाटण/ प्रतिनिधी : ऐतिहासिक तिर्थक्षेत्र चाफळ येथील श्रीराम मंदिरात आज झालेल्या श्रीराम नवमी उत्सवात श्रीराम जन्मोत्सव सोहळा हजारो भाविक व भक्तगणांच्या उपस्थित, गुलाल खोबर्‍यांच्या उधळणीत भक्तीमय वातावरणात पार पडला. चाफळ नगरीतील समर्थ रामदास स्वामी स्थापित या पुण्यभूमीत आज 372 वा श्री राम जन्मोत्सव सोहळा धार्मिक विधिवत उपक्रमांनी साजरा करण्यात आला. 

प्रभु श्रीरामाच्या या जन्म सोहळ्यासाठी मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केल्यामुळे परिसर भक्तगणांनी खचाखच भरून गेला होता. जन्मोत्सवासाठी श्री रामाचा फुलांनी सजवलेला पाळणा मंदिराच्या पुढील गाभार्‍यात उंच बांधण्यात आला होता. सकाळी 11.30 वाजता समर्थ भक्त के. बी.क्षीरसागरमहाराज यांची जन्मोत्सवाची नारदीय किर्तनसेवा झाली. 

किर्तनातील प्रभु श्रीराम हे रावण वध करून अयोध्येस परत येतात, असा कथा भाग सांगितला जात असताना बरोबर 12 वा 20 मिनिटांनी सर्व उपस्थित भक्तगण प्रभुच्या पाण्यावर पुष्प व गुलाल खोबर्‍यांची वृष्टी करत श्रीराम जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करतात. यावेळी ‘प्रभु श्रीराम चंद्र की जय, सत सीताराम की जय’ अशा जयघोषणांनी मंदिर परिसरात दुमदुमून गेला होता. यानंतर सर्व भाविकभक्तांना सुंठवडा व महाप्रसाद देण्यात आला. चाफळमधील श्रीरामाच्या जन्मोत्सवामध्ये उपस्थित सर्वच भक्तांना उमरकांचन ता. पाटण येथील श्री. काशिनाथ बापू मोहिते (मुकादम) यांच्याकडून महाप्रसाद वाटप करण्यात आले. त्यांच्याकडून महाप्रसाद देण्याचे हे 12 वे वर्ष आहे. श्री राम देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीकडून भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय ठिकठिकाणी केली होती. उत्सवामध्ये सर्व भाविक भक्तांना पुरक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष जोशी, व्यवस्थापक बा. मा. सुतार, विश्र्वस्त अनिल साळुंखे चाफळ ग्रामपंचायत प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती.