Breaking News

अब्दुल सत्तारांचा हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर


औरंगाबाद : निवडणुकीच्या प्रार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे लोकसभा उमेदवार आणि शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 

सत्तार यांना औरंगाबादमधून लोकसभेचे तिकीट हवे होते. पण तिकीट मिळालं नसल्याने त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांना सोबत पत्रकार परिषद घेऊन अब्दुल सत्तार यांनी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला. सत्तार काँग्रेसवर नाराज झाल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, भाजपमध्ये जाणार नसल्याचे आधीच स्पष्ठ केले होते. तसेच, काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवणार, अशी भूमिका आमदार सत्तार यांनी घेतली होती. इतकच नाही तर 3 एप्रिलला आपला उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, समर्थकांनी अपक्ष निवडणूक न लढवता काँग्रेसने उमेदवारी दिली तरच निवडणूक लढवावी, अशी भूमिका घेतली. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी 8 एप्रिलला आपली उमेदवारी मागे घेतली. उमेदवारी मागे घेतली असली तरी त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हर्षवर्धन जाधव उच्च शिक्षित आणि नवीन धोरण असलेला उमेदवार असल्याने त्यांना पाठिंबा देत असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले. हर्षवर्धन जाधव निवडून आल्यावर आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. मात्र, उद्यापासून हर्षवर्धन जाधवांचा प्रचार करणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.