Breaking News

स्त्री कलाकारांच्या बाबतीतच अपमानास्पद चित्रण का ? अभिनेत्री स्पृहा जोशीचा संताप

Image result for अभिनेत्री स्पृहा जोशी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मैदानात अनेक अभिनेत्याप्रमाणेच अभिनेत्री देखील राजकारणांत प्रवेश केला आहे. मात्र राजकारणांत उतरलेल्या अभिनेत्रींचे ज्याप्रकारे चित्रण केल्या जात आहे, त्यावरून युवा अभिनेत्री स्पृहा जोशीने नाराजी व्यक्त केली आहे. स्पृहाने फेसबुक पोस्ट लिहून आपली खदखद बोलून दाखवली आहे.
उर्मिला मातोंडकर काँगेसकडून लोकसभेच्या उमेदवार आहेत. तर पश्‍चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसकडून मिमी चक्रवर्ती, नुस्रत जहाँ या अभिनेत्री आहेत. ज्या ट्विटरपासून ते चहाच्या टपरीपर्यंत सगळीकडे ट्रेंडिंग आहेत. चर्चेचा विषय झाल्यात. गंमत अशी की या अभिनेत्रींसाठी राजकारणातली एंट्री तशी कसरतच असते. ‘अभिनेत्री’ म्हणून असलेली लोकप्रियता हा त्यांच्या आणि त्यांच्या पार्टीसाठी ‘कॅश’ करण्याचा विषय असतोच. पण आपल्या सेक्सिस्ट समाजामध्ये-माफ करा पण धडधडीतपणे हाच शब्द वापरणं मला भाग आहे. तर या सेक्सिस्ट समाजामध्ये त्यांचे ‘अभिनेत्री’ असणे हे कित्येकदा अपमानकारक पद्धतीने दर्शवले जाते. असे स्पृहाने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
‘सध्या बंगालमध्ये मिमी आणि नुसरतच्या सो कॉल्ड ‘रिव्हिलिंग’ कपड्यांवरून त्यांना ट्रोल करणारे ‘मीम्स’ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने म्हटले. - त्या आपल्या ‘घुंगरू’ आणि ‘ठुमक्यांनी’ लोकांना तल्लीन करून टाकतील आणि त्यांच्या रात्री ‘रंगीन’ करून टाकतील! किती भयानक वाटते हे सगळे’ असे लिहित स्पृहाने संताप व्यक्त केला आहे. ‘फक्त अभिनेत्रींच्याच वाट्याला का? अभिनय करून मग राजकारणात उतरणार्‍या अभिनेत्यांना, का नाही या सगळ्याला तोंड द्यावं लागत? गोविंदा, शत्रुघ्न सिन्हा, कितीतरी जण उतरलेत की राजकारणात. मग फक्त स्त्री कलाकारांच्या बाबतीत अशी सोयीस्कर घाणेरडी वृत्ती कशी उभारून येते आपल्याकडे ? याची पाळंमुळं फार खोल रुजली आहेत. बाईला नुसती वस्तू मानण्याच्या आपल्या किडक्या मनोवृत्तीत.’ असं निरीक्षणही स्पृहाने नोंदवलं आहे.’प्रचार करताना इतकी घाणेरडी पातळी का गाठावी लागते? कुठलाही प्रचार सेन्सिबल मुद्द्यांना धरून होऊच शकत नाही?? सभ्यतेची किमान पातळी धरून होऊ शकत नाही?’ असे सवालही स्पृहाने उपस्थित केले आहेत.