Breaking News

प्रामाणिक कर्मचारी ही एसटीची संपत्ती : प्रतापसिंह सावंत


वडूज / प्रतिनिधी : एस. टी. महामंडळात लहान मोठ्या पदावर काम करणारे प्रामाणिक अधिकारी, कर्मचारी हीच खरी संपत्ती आहे. असे मत राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रतापसिंह सावंत यांनी व्यक्त केले.

वडूज आगाराच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंतांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विभाग नियंत्रक सागर पळसुले, यंत्र विभाग अभियंता श्री. मोहिते, वाहतुक अधिक्षक श्री. मोरे, माजी आगारप्रमुख शिवाजीराव जाधव, कामगार सेनेचे जेष्ठ नेते प्रल्हाद सपकाळ, आगार व्यवस्थापक विकास माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. सावंत म्हणाले, चांगले उत्पन्न देणारा डेपो अशी वडूज आगाराची ख्याती आहे. अधिकारी, कर्मचर्‍यांनी एकदिलाने काम करुन नावलौकीक वाढवावा. सातारा जिल्ह्याचे भूमीपूत्र असल्या कारणाने वडूज, कोरेगांव, दहिवडी व इतर आगाराबद्दल विशेष आत्मियता आहे. शिवाजी जाधव यांनी भाषणात जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी गोंदवले येथील मुख्याध्यापक सुरेश आकाराम कदम व त्यांच्या पत्नी संगिता कदम यांना अपघातसमयी मदत करुन प्राण वाचवणार्‍या चालक आप्पासाहेब यादव, डांभेवाडी येथील लक्ष्मी दुबळे या दलित महिलेचे दागिने प्रामाणिकपणे परत करणारे वाहतुक नियंत्रक संभाजी इंगळे यांचा महाव्यवस्थापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास निवृत्त वरिष्ठ लेखपाल वसंतराव पाटोळे, श्री. वाघ, कैलास जाधव, वसंतराव तुपे, हणमंतराव भोसले, रमेश माने, अशोक चव्हाण आदिंसह चालक-वाहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आप्पासाहेब यादव यांनी आभार मानले.