Breaking News

बुलडाणा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात


बुलडाणा,(प्रतिनिधी): शिका व संघटीत व्हा, अशी शिकवण देत अनेकांचा उद्धार बाबासाहेबांनी केला. बाबासाहेबांनी दिलेल्या मूलमंत्राने संघटीत झालेल्या हजारो भीमसैनिकांनी 14 एप्रिल रोजी समता,न्याय,बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देत त्यांना शोभयात्रेतून निळी सलामी दिली. या शोभायात्रेत निळे फेटे, निळे झेंडे व शुभ्र वस्त्र परिधान करुन भीमसैनिकच नव्हे तर लहान थोर या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या शोभा यात्रेमुळे अवघे शहर निळे झाले होते.जयंती निमित्त आज दिवसभर मोटार सायकल रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन शहरासह परिसरात करण्यात आले होते. शहरातील मिरवणुकीदरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अनेक सामाजिक संघटनांनी केली होती.

सायंकाळची वेळ, उंच आकाशात फडफडणारे पंचशील व निळे झेंडे, फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा निनाद, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले बौध्द उपासक व उपासिका, सर्वत्र निळ्या रंगाची उधळण व जयभीमचा जयघोष करण्यात येत होता. या मिरवणुकीत शहरासह सुंदरखेड व परिसरातील भीम रथ सहभागी झाले होते. यावेळी आपापल्या वॉर्डातील नागरिकांनी वाहनांवर विविध आकर्षक देखावे सादर करून बुलडाणेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. चौकाचौकात शुभेच्छांचे डिजिटल बोर्ड व स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. लेझीम पथक, लाठ्या काठ्यांचे प्रात्यक्षिक आणि इतर चित्तथरारक प्रात्यक्षिके या मिरवणुकीत सादर करण्यात आली. गांधी भवन येथून सुरूवात झालेली भीम जयंतीची मिरवणूक आठवडी बाजार, सराफा गल्ली, संगम चौक, तहसील चौक, स्टेट बँक चौक, यासह शहराच्या प्रमुख मार्गावरून रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. भीम जयंती निमित्त वॉर्डावॉर्डांत विविध कार्यक्रम तसेच स्पर्धा घेण्यात आल्या. ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार व अभिवादन करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. मिरवणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

फटाक्यांची आतषबाजी करून केले भीम जन्माचे स्वागत भीमजयंतीच्या पूर्व संध्येला म्हणजे 13 एप्रिल रोजी रात्री बाराचे ठोके पडल्यानंतर जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणावर फटाक्याची आतषबाजी करून भीम जन्माचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आकाश न्हाऊन निघाले होते. शहरातून काढली मोटार सायकल रॅली: आज सकाळी नऊ वाजता जयंती उत्सव समितीच्या वतीने मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विजय नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरूवात करण्यात आली. या रॅलीत महिलांसह मुलींनी डोक्यावर निळा फेटा बांधून सहभाग घेतला होता. तसेच दुचाकीला निळा व पंचशील झेंडा व डोक्यावर निळा फेटा परिधान करून शेकडो युवक रॅलीत सहभागी झाले होते. ही रॅली सर्क्युलर रोड, धाड नाका, संगम चौक, शिवायल, एडेड चौक, कारंजा चौक, जयस्तंभ चौक मार्गे तीन पुतळ्याला हारार्पण करून मच्छी ले आऊट विश्‍वशांती बुध्द विहार येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. चिखलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन चिखली भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. आज सकाळी येथील जयस्तंभ चौकातील फुले आंबेडकर वाटिकेमध्ये घेण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून पर्यवेक्षक समाधान शेळके यांची उपस्थिती होती.

तर मंचावर तालुका संघचालक अरविंदराव असोलकर, नगर संघचालक शरद भाला हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भीमवंदनेने करण्यात आली. यानंतर प्रमुख वक्ते समाधान शेळके यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताची राज्यघटना तयार करण्याचे अतिशय क्लिष्ट काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना करावे लागले. मात्र त्यांनी हे शिवधनुष्य अतिशय लिलया पेलले व संपूर्ण जगात सशक्त अशी लोकशाही भारतामध्ये निर्माण केली. डॉ. आंबेडकरांच्या अंगी असलेल्या प्रचंड विद्वत्तेचा त्यांनी देशासाठी वापर केला. आपल्या समाजाला सुशिक्षीत करण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले. प्रत्येकाने आपला समाज सुशिक्षीत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहनही शेळके यांनी केले. हिंदू धर्मातील काही कुप्रथांना विरोध करत त्यांनी धर्मातर केले. बौद्ध धर्म स्वीकारला, यावेळी इतर धर्मात प्रवेश करण्यासाठी त्यांना अनेक आमिषे दाखवण्यात आली. परंतु त्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता देशहिताला प्राधान्य देत बौध्द धर्मात प्रवेश केला असे सांगून डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील अनेक घटनांचा मागोवा शेळके यांनी आपल्या मनोगतातून घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित नागरिकांचे आभार प्रा. प्रदीप बारड यांनी मानले.

किनगावराजात भीम जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम किनगावराजा : येथील भीम जयंती युवा उत्सव समितीच्या वतीने घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बा बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या निमित्ताने विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमासाठी सर्व समाजातील समाज बांधव उपस्थित होते. यावेळी विचार पीठावर सेवानिवृत्त शिक्षक विश्‍वनाथ काकडे गुरुजी, माजी सैनिक विश्‍वनाथ काकड, व्यापारी आघाडीचे सुभाष घिके, शिवाजीराव काळूसे गुरुजी, प्रकाश जैन, गणेशराव जाधव, गणेश काकड, माजी सरपंच इंदुमती साळवे, ग्रा.पं. सदस्या शिंगणे, सुनीता राजोते यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच विशाखा म्हस्के, प्रा.किशोर खरात यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान साळवे यांनी केले. सूत्रसंचालन समाधान साळवे तर आभार भीमराव खाडे यांनी मानले. बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेबांना अभिवादन मोताळा :तालुक्यातील बोराखेडी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वाचन सप्ताहाचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला जयंतीनिमित्त सदस्य अमोल फुंड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर विचार व्यक्त केले. कवी सदाशिव गोलाईत यांनी जयंतीनिमित्त आज स्वच्छता, बेटी बचाव, आईची ममता या विषयावर कविता सादर केली. शिक्षक तायडे यांनीही मार्गदर्शन केले. नियमित एक तास विद्यार्थ्यांना ग्रंथालयाची पुस्तके वाचनास देऊन वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचन सप्ताह सुरू राहील, असे सांगितले. यावेळी महेंद्र तायडे, रजनी बांगर, रेखा नेमाडे, अनुप्रिता व्याळेकर, सुनीता हुडेकर, वामिंद्रा गजभिये, सुनीता न्हावकर, जया चव्हाण, नलिनी जाधव, संध्या नाईक, सागर गोलाईत व विद्यार्थी उपस्थित होते.