Breaking News

आचारसंहितेच्या नावाखाली मदत देण्यात होतेय टाळाटाळ तामकडेतील आग दुर्घनाग्रस्त अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतिक्षेत

कोयनानगर / संजय कांबळे : सध्या आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अवघी शासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. आचारसंहितेचा धसका भल्याभल्यांनी घेतला आहे. लोकांसाठी म्हणून काही तरी करायला जायचो आणि आचारसंहितेची नसती बिलामत मागे लागायची. त्यापेक्षा निमुटपणे बसण्यात धन्यता एखाद्या व्यक्तीने मानली तर समजू शकेल. पण एखाद्या सर्वसामान्य गरीब शेतकर्‍याची एक-दोन नव्हे तर गायी, म्हैशी, बैल अशी दहा गुरेढोरे डोळ्यासमोर आगीत होरपळून मरण पावली असताना, त्या शेतकर्‍याला आचारसंहितेच्या नावाखाली तातडीची शासकीय मदत मिळत नसेल तर या आचारसंहितेला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणार्‍या शासकीय यंत्रणेला सामाजिक संवेदनेची जाणीव करून द्यायची कोणी?असा उद्विग्न सवाल विचारण्यात येत असून आता याबाबत थेट जिल्हाधिकार्‍यांनीच लक्ष घालून संबंधित शेतकर्‍याला न्याय मिळवून देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तामकडे, (ता.पाटण) येथील राजाराम बापू पवार यांच्या गुरे बांधलेल्या शेडला (दि.20) मार्च रोजी होळीच्या दिवशी भर दुपारी लागलेल्या आगीत दोन गायी व एक म्हैस, खोंड,कालवड अशी पाच जनावरे जागेवरच होरपळून मरण पावली तर एक म्हैस व पाच बैल ही उर्वरित जनावरे नव्वद टक्के भाजलेल्या अवस्थेत असल्याने ती ही जनावरे जगू शकणार नाहीत. यातील केवळ एक बैल शिल्लक राहिला आहे. या आग दुर्घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या मंडलाधिकारी तसेच तलाठी यांनी घटनास्थळाकडे तात्काळ धाव घेत तातडीने पंचनामे केले.पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत जखमी जनावरांवर उपचार सुरू करून अहवाल सादर केला असून या दुर्घटनेत राजाराम पवार यांची दुभती जनावरे, बैल आदी गुरेढोरे आणि शेती साहित्य असे 5 लाख 14 हजारांचे आर्थिक नुकसान झाले.
शासकीय पातळीवरून पंचनामे होवूनही मात्र पंधरवडा उलटूनही अद्याप तातडीची मदत मिळालेली नाही. आता पशुधन आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे पवार कुटुंबासमोर रोजीरोटीचा प्रश्र्न निर्माण झाला आहे.
आदर्श आचारसंहितेच्या काळात घडलेल्या अशा दुर्दैवी घटनेप्रसंगी शासकीय यंत्रणेने सामाजिक संवेदनशीलततेचा ‘आचार’ आणि दुर्दैवी घटकाला न्याय मिळवून देण्याची ’संहिता’ दाखवून देण्याची गरज आहे.संबंधित दुर्दैवी शेतकर्‍याला तातडीने देण्यात येणार्‍या शासकीय मदतीचा ’तो’ धनादेश देण्यासाठी पंधरा दिवस उलटल्यानंतरही शासकीय यंत्रणा कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहे.
या दुर्दैवी प्रसंगातून संबंधित शेतकर्‍याला सावरुन त्याला मदतीचा हातभार लावण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालून या गरीब शेतकर्‍याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.