Breaking News

राजस्थान रॉयल्स घरच्या मैदानावर पराभूत कोलकाता नाईट रायडर्सची विजयी घोडदौडजयपूर : कोलकाता नाईट रायडर्सने आपली विजयी घोडदौड कायम राखत राजस्थान रॉयल्सला घरच्या मैदानावरच पराभूत केलं आहे. जयपूरमधल्या बॅटिंग पीचवर टॉस जिंकल्यानंतर देखील कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन दिनेश कार्तिकने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र, राजस्थान रॉयल्सची बॅटिंग संपली, तेव्हा कार्तिकचा निर्णय योग्यच असल्याचं सिद्ध झालं होतं. कोलकात्याच्या बॉलर्सनी राजस्थानच्या बॅट्समन्सला अवघ्या 139 रन्सवर रोखलं होतं. स्टीव्ह स्मिथ वगळता राजस्थान रॉयल्सच्या एकाही बॅट्समनला आपली छाप सोडता आली नाही. त्यामुळेच त्यांच्या डावाला कळा आली.
बॅटिंग पीचवर बॅटिंग करण्यासाठी उतरलेली राजस्थानची टीम मोठी धावसंख्या उभारेल, असा अंदाज सगळ्यांनी वर्तवला होता. पण झालं उलटंच! दुसर्‍या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर प्रसिध कृष्णानं कॅप्टन अजिंक्य रहाणेची मोठी विकेट एलबीडब्ल्यूच्या अपीलवर घेतली. 5 रनांवर रहाणे तंबूत परतल्यानंतर सलामीवीर बटलरनं स्टीव्ह स्मिथच्या साथीनं राजस्थानच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली. पण संथगतीनं खेळणार्‍या बटलरला 37 रनांवर गर्नीनं शुभमकडे कॅच द्यायला भाग पाडलं. तेव्हा राजस्थानचे 12व्या ओव्हरमध्ये फक्त 77 रन झाले होते. एका बाजूने स्टीव्ह स्मिथ पाय रोवून उभा असताना दुसर्‍या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. प्रत्येक येणार्‍या नव्या बॅट्समनने जास्त बॉल घेऊन कमी रन केल्यामुळे स्मिथवरचा दबाव वाढत गेला. 15व्या ओव्हरमध्ये टीमचे 105 रन झाले असताना 8 बॉलमध्ये 6 रन करून त्रिपाठी आऊट झाला. त्याच्यानंतर आलेल्या बेन स्टोक्सनं शेवटच्या षटकांमध्ये भरपूर बॉल वाया घालवले. त्यामुळे राजस्थानला 139 धावांवर रोखण्यात कोलकाताला यश आलं. यात एकट्या स्टीव्ह स्मिथचे 73 रन होते! अपेक्षेप्रमाणेच केकेआरची सुरुवात दणक्यात झाली. के गौथमच्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये एक षटकार आणि 4 चौकार वसूल करत सुनील नरेननं इंगा दाखवून दिला. 10व्या ओव्हरपर्यंत नरेननं राजस्थानच्या बॉलिंगची अक्षरश: पिसं काढली. लिनसोबत त्यानं 91 रनांची ओपनिंग पार्टनरशीप केली. यामध्ये 25 बॉलमध्ये तडकावलेल्या त्याच्या 47 रनांचा समावेश होता. यात त्याने 3 षटकार आणि 6 चौकाल लगावले. गोपालच्या बॉलिंगवर स्मिथने नरेनचा कॅच घेतल्यानंतर रॉबिन उथप्पा मैदानात उतरला. पण त्यानेदेखील नरेनचीच बॅटिंग ‘टू बी कंटिन्यूड’ करत असल्याप्रमाणे आल्या आल्या मिथुनला 2 चौकार लगावत आपणही थांबणार नसल्याचं स्पष्ट केलं. 31 बॉलमध्ये अर्धशतक लगावल्यानंतर लिन माघारी परतला. तोपर्यंत टीमच्या 11 ओव्हरमध्ये 114 धावा झाल्या होत्या. रॉबिन उथप्पाने शुभम गिलला साथीला घेत राजस्थानच्या बॉलर्सची धुलाई सुरुच ठेवली. एस गोपालला त्याने सरळ लगावलेला षटकार सगळ्यांचीच वाहवा मिळवून गेला. या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्स पॉइंट टेबलमध्ये दुसर्‍या स्थानावर विराजमान झाला असून राजस्थान रॉयल्स शेवटून दुसर्‍या क्रमांकावर कायम राहिली आहे.