Breaking News

अध्यात्मिक विचारातून मानव व विश्‍वाला शांती मिळेल : डॉ. श्रीपाल सबनीस


पुणे : जगात तिसरे महायुध्द झाले तर या सृष्टीवर एकही माणूस जिवंत राहू शकणार नाही. अशा वेळेस विश्‍वाला वाचविण्यासाठी कोण समोर येईल, हा मोठा प्रश्‍न आहे. आध्यात्मिक विचार हाच प्रत्येक मानवाला शांती प्राप्त करून देऊन सुखी व समाधानी करू शकतो. त्यासाठी येथे विश्‍व शांतीचा विश्‍वात्मक प्रयोग सुरू आहे, असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मांडले.
एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठ, पुणे आणि एमआयटी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने विश्‍वराजबाग, लोणी काळभोर येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाचा उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जगप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे होते.
सबनीस म्हणाले, देशाने आम्हाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेले असताना सुद्धा प्रत्येक धर्म हा वेगवेगळ्या रंगामध्ये वाटला गेला आहे. परंतू या देशाच्या संविधानाचा एकच रंग आहे. तो म्हणजे तिरंगा. त्यात सर्वधर्मांचा समावेश आहे. येथील वास्तूमध्ये यज्ञ झाला. त्यात सर्व धर्माच्या लोकांनी आहुती दिल्या. कदाचित ही सृष्टीवरील पहिलीच घटना असेल. या यज्ञामध्ये प्रत्येक धर्माच्या प्रतिनिधींच्या हस्ते ज्ञानात्मक आहुती दिली गेली. यात षड्रिपू जाळावयाचे असतात. त्याला अनुसरून डॉ. कराड यांचे विश्‍वात्मक कार्य सुरू आहे.
डॉ.विजय भटकर म्हणाले, श्रीमद्भगवद्गीता ज्ञानभवनाचे उद्घाटन होणे, हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे. गीतेच्या 18 अध्यायात संपूर्ण मानवी जीवनाचे रहस्य उलगडले आहे. जीवनात काय करावे, काय करू नये, यासाठी गीता आहे. तसेच धर्म म्हणजे काय, याचाही उलगडा होतो. संपूर्ण जगाचा साक्षात्कार या वास्तूमध्ये अनुभवावयास येतो. स्वामी विवेकांनद यांनी सांगितल्यानुसार 21 व्या शतकात भारत विश्‍व गुरू म्हणून उद्यास येईल. त्याच पद्धतीने आम्ही वाटचाल करीत आहोत. ते दृश्य आता साकार होतांना दिसत आहे.या गीताभवनातून जगाला सर्व धर्मांच्या एकतेची जाणीव होईल. सर्व धर्मांचा एकच संदेश म्हणजे शांती, या भावनेची जाणीव नव्या पिढीला होण्यासाठी ही वास्तू महत्वपूर्ण कार्य करेल. प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, विश्‍वात शांती निर्माण करण्यासाठी नववर्षाच्या प्रारंभी गीता ज्ञानभवनाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून संपूर्ण जगाला भारतीय संस्कृतीचा नवा संदेश द्यावयाचा आहे. वसुधैव कुटुम्बकमची संकल्पना साकार करणे व मानवी सहिष्णुतेचा संदेश येथून संपूर्ण जगाला दिला जाईल. या देशात ज्ञानाची पूजा आणि अंतिम सत्याचा शोध घेतला जातो. स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाकितानुसार 21 व्या शतकात भारत हा विश्‍वगुरू म्हणून उदयास येणार आहे.