Breaking News

उज्वला गॅस योजनेचं तीन तेरापाटण /प्रतिनिधी :- ग्रामीण महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवणे यासाठी केंद्र सरकारने मोठा गाजावाज करीत ‘आणलेल्या उज्ज्वला गॅस योजनेच्या ग्रामीण भागात तीन तेरा वाजल्या आहेत. घरोघरी गॅस सिलिंडर आला असला तरी गॅस पुनर्भरण परवडत नसल्याने अनेकांनी पुन्हा चुलीचा आधार घेतला आहे. तर पाटण तालुक्यातील डोंगर पठारावर गॅस सिलिंडर वापराबाबत योग्य जागरूकता नसल्याने अनेकांनी गॅस सिलिंडर बंद करून चुलीवरच जेवण तयार करण्यास सुरुवात केली आहे. डोंगर पठारवर मोठ्या प्रमाणात सरपणाची सोय असल्याने शासनाची ही उज्ज्वला गॅस योजना फक्त नावालाच उरली असल्याचे चित्र येथे पाहण्यास मिळत आहे.

नैसर्गिक साधनसंपत्तीचा र्‍हास होऊ नये, प्रदूषणावर नियंत्रण राहावे आणि ग्रामीण महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवणे यासाठी केंद्र सरकारने ‘उज्ज्वला गॅस योजना’ राबवली. या योजनेद्वारे अल्पदरात गॅसजोडणी करून मिळाली. मात्र पहिल्यांदा अल्पदरात गॅसजोडणी आणि सिलिंडर मिळाला असला तरी सिलिंडरमध्ये पुन्हा गॅस भरण्यासाठी मात्र त्यांना इतर कुटूंबाप्रमाणे दर द्यावा लागत आहे.
डोंगर पठारावर राहणार्‍या आर्थिक दुर्बल घटकांमधील नागरिकांना ही रक्कम परवडणारी नसल्याने अनेक जण गॅसचा वापर करत नसल्याचे दिसून आले आहे. फक्त पै-पाहुणे नातेवाईक आल्यानंतर तातडीने चहा बनवण्यासाठी गॅसचा वापर करायचा. आणि नंतर त्यांचे आणि घरगुती दररोज लागणारे जेवण, गरम पाणी ही कामे चुलीवरच करायची, अशीच धारणा आजही ग्रामीण भागात दिसून येत आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेचा फारसा उपयोग येथील महिलांना झाला नसल्याचे दिसत आहे.

पाटण तालुक्यातील गॅस एजन्सी धारकांनी या उज्ज्वला गॅस योजनेसाठी ग्रामीण वितरकामार्फत गावोगावी जनजागृती केली. काही ठिकाणी तर स्वस्तात गॅस देतो म्हणून कुटुंबियांना गॅसवर ठेवले.

त्या कुटूंबियांना आजतागायत या योजनेतून गॅस मिळाला नाही. वाढत्या महागाईमुळे संसाराची होत असलेली ओढाताण त्यामध्ये हा महागडा गॅस कसा वापरायचा, ही विवंचना या महिलांना सतावत आहे. त्यामुळे बहुतांशी महिलांनी पहिल्यांदाच अनुदानाने मिळालेला सिलिंडर वापरला. त्यानंतर दुसरा सिलिंडर घेण्यासाठी त्यांनी अजूनपर्यंत वितरकाच्या दारात पाय टाकलेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथील महिला सरपनाचा वापर करताना दिसत आहेत.

उज्जवला योजने अंतर्गत गॅस घेतल्याने रेशनकार्डवर पुरवठा विभागाकडून शिक्का मारण्यात आला आहे. त्यामुळे रॉकेल दुकानदारांनी त्यांचा रॉकेलचा कोटा कमी केला आहे. त्यामुळे केरोसिन नाही आणि गॅस नाही त्यामुळे चुली कश्यावर पेटवायची असा प्रश्र्न ग्रामीण महिलांना सतावू लागला आहे. एखाद्याने गॅस नवीन भरून आणला तरी त्यांना तो जोडता येत नसल्याने त्यांची अडचण होत आहे.

गावातील माहितगार महिेलेकडून तो जोडून घ्यावा लागत आहे. या महिलेला सुद्धा गॅस जोडण्यासाठी दर द्यावा लागत आहे. उज्ज्वला गॅस ही योजना महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना असून तिचा वापर करण्यासाठी जनजागृती होणे अपेक्षित आहे.
त्यासाठी गॅस एजन्सी धारकांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे गरजेचे असून मात्र शासनानेही त्यासाठी लक्ष देणे अपेक्षित असल्याची चर्चा महिला करताना दिसत आहेत.